नवी मुंबईतला अपघाताचा टक्का घसरला; राज्यात पटकावले तिसरे स्थान

By सूर्यकांत वाघमारे | Published: January 16, 2024 05:05 PM2024-01-16T17:05:26+5:302024-01-16T17:07:07+5:30

जनजागृतीसह रस्त्याच्या परिस्थितीत सुधार. 

Accident rate falls in navi mumbai Won third place in the state | नवी मुंबईतला अपघाताचा टक्का घसरला; राज्यात पटकावले तिसरे स्थान

नवी मुंबईतला अपघाताचा टक्का घसरला; राज्यात पटकावले तिसरे स्थान

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई : रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यात नवी मुंबईने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये १७.७ टक्के ने अपघातांचे प्रमाण घटले आहे. त्याबद्दल रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने नवी मुंबई वाहतूक पोलिस व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. 

रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पोलिस यांच्याकडून वाहन चालकांना शिस्त लावण्याचे प्रयत्न केले जातात. त्यामध्ये नियम तोडणाऱ्यांवर कारवाईसह चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती केली जाते. शिवाय अपघातांना कारणीभूत ठरणारी रस्त्यावरील परिस्थिती सुधारण्याचाही प्रयत्न केला जातो. त्यानुसार मागील काही वर्षात सातत्याने अपघात घडणाऱ्या ठिकाणांचा (ब्लॅक स्पॉट) अभ्यास करून तिथले अपघात कसे रोखता येतील याबाबत उपाय योजना राबवल्या जात होत्या.

यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देखील अशा ठिकाणी आवश्यक कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे २०२२ च्या तुलनेत  २०२३ मध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण १७.७ टक्के ने घसरले आहे. हे प्रमाण राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे ठरले आहे. तर मुंबई शहर व उपनगर यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून चंद्रपूर जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल मुंबईत आयोजित कार्यक्रमात नवी मुंबई पोलिस वाहतूक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, अतिरिक्त पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग आदी उपस्थित होते. 

Web Title: Accident rate falls in navi mumbai Won third place in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.