नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर रस्त्याच्या कडेला पडलेली बारीक रेती आणि काचेचे तुकडे, दगड यामुळे दुचाकी वाहने घसरत असून, लहान-मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे या महामार्गाकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनचालकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.मुंबई-पुणे या मार्गाला जोडणारा सायन-पनवेल महत्त्वाचा महामार्ग आहे. या मार्गावर दिवसाला लाखो वाहने ये-जा करीत असतात. दिवसेंदिवस वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे महामार्ग अपुरा पडू लागल्याने होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी महामार्गचे रुं दीकरण करण्यात आले. रुंदीकरण करताना या महामार्गावर उरणफाटा, नेरु ळ, जुईनगर, सानपाडा आदी भागात उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत.वाहनांची प्रचंड वर्दळ असलेल्या महामार्गाची स्वच्छता केली जात नाही, त्यामुळे या महामार्गावर उरणफाटा ते वाशी टोलनाक्यापर्यंतच्या भागात दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर रेती, खडी, काचेचे तुकडे, मद्याच्या रिकाम्या बाटल्या, कचरा पसरले आहे. या महामार्गावरील उड्डाणपुलांवरही मोठ्या प्रमाणावर रेती आणि खडी पसरलेली असून, महामार्गावर पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळेही रेती महामार्गाच्या कडेला पसरलेली आहे.महामार्गावरून जड अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने हलकी वाहने एका बाजूने ये-जा करतात. महामार्गाच्या एका बाजूने ये-जा करणाऱ्या दुचाकी वाहनचालकांना रेती आणिखडीमुळे कमालीची कसरत करावी लागत आहे.अनेक वेळा रेती आणि खडीमुळे दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. या महामार्गाच्या स्वच्छतेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचेदुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करीत असून, वेळोवेळी स्वच्छता करण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत.
सायन-पनवेल महामार्गावरील रेतीमुळे अपघाताचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 11:25 PM