उघड्या गटारांमुळे अपघातांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 04:35 AM2018-11-15T04:35:36+5:302018-11-15T04:37:14+5:30

झाकणाविना गटारे : दुचाकीस्वारांचा ठाणे-बेलापूर मार्गावर प्रवास असुरक्षित

Accidental hazard due to open gutters | उघड्या गटारांमुळे अपघातांचा धोका

उघड्या गटारांमुळे अपघातांचा धोका

Next

नवी मुंबई : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील दुचाकीस्वारांचा प्रवास असुरक्षित झाला आहे. रस्त्यालगतची गटारे अनेक महिन्यांपासून उघडीच असल्याने रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण होत आहे, तर काही ठिकाणी पावसाळ्यादरम्यान काढलेला गटारातील गाळही रस्त्यालगतच पडून आहे.

नवी मुंबईला ठाण्याशी जोडण्याकरिता ठाणे-बेलापूर मार्ग महत्त्वाचा ठरत आहे. सदर मार्गावर पूर्वी होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी रस्त्याची रुंदी वाढवण्यात आली असून, आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अधिकच जलद गतीची झाली आहे. त्यानुसार या मार्गावरून दिवस-रात्र मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ सुरू असते; परंतु अनेक ठिकाणी रस्त्यालगतची गटारे उघडीच असल्याचे दिसून येत आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर कोपरखैरणे, ऐरोलीसह इतर अनेक ठिकाणी हे चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ही गटारे बनवण्यात आली आहेत. मात्र, बहुतेक ठिकाणी ती सुरुवातीपासूनच उघडी आहेत. तर काही ठिकाणी पावसाळ्यादरम्यान सफाईसाठी उघडल्यानंतर ती बंदिस्त करण्यात आलेली नाहीत. शिवाय, त्यामधून काढलेला गाळही अनेक महिन्यांपासून रस्त्यालगतच पडून आहे. यामुळे रात्रीच्या वेळी अशा ठिकाणी दुचाकीस्वारांच्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूलाच ही उघडी गटारे आहेत.

कार्यवाहीची मागणी

एखाद्या भरधाव अवजड वाहनापासून सुरक्षित राहण्यासाठी डाव्या बाजूने दुचाकी चालवणाऱ्या दुचाकीस्वाराला अशा उघड्या गटारांमुळे अपघाताला सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर जागोजागी निर्माण झालेली अपघातसदृश परिस्थिती दूर करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते हर्षल नाईक यांनी केली आहे. बोनकोडे येथे राहणारे हर्षल हे सदर मार्गाने खासगी वाहनातून प्रवास करतात. रात्रीच्या वेळी ही उघडी गटारे अपघाताला कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त करत ती बंदिस्त करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.
 

Web Title: Accidental hazard due to open gutters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.