नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर सानपाडा येथे बांधण्यात आलेल्या पादचारी पूलाचे काम अपूर्णावस्थेत आहे, यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे महामार्ग ओलांडताना अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. महामार्गावरील पादचारी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सायन-पनवेल महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले असून, यामुळे महामार्गावरील वाहनांचा वेगदेखील वाढला आहे. महामार्गाच्या रुंदीकरणा वेळी भुयारी आणि पादचारी मार्ग बनविण्यात आले आहेत; परंतु यामधील अनेक पादचारी आणि भुयारीमार्गांचा वापर होत नाही.
महामार्गावर सानपाडा येथे बांधण्या आलेला पादचारी पूल अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी महामार्ग ओलांडताना वाहनांच्या दिव्यांमुळे संभ्रम निर्माण होऊन अनेक अपघात घडले आहेत. मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पादचारी पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.