नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील वाशी खाडीपुलावर अनेक महिन्यांपासून अंधार आहे. विद्युत दिवे बंद असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. नागरिकांसह पोलिसांनी तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे.महामार्गावरील समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. वाशी ते पनवेल दरम्यानचे पथदिवे बंद असल्यामुळे सामाजिक व राजकीय संघटनांनी आंदोलने केली होती. आंदोलनानंतर जवळपास एका वर्षाने पथदिवे पुन्हा सुरू करण्यात आले आहेत; परंतु मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी खाडीपुलावरील अंधार अद्याप दूर झालेला नाही. अनेक महिन्यांपासून येथील सर्व पथदिवे बंदच आहेत. यामुळे रात्री अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मोटारसायकलचे अनेक किरकोळ अपघात झाले आहेत.या विषयी वाहतूक पोलिसांनी अनेक पत्र बांधकाम विभागाला दिली आहेत; परंतु सर्व पत्रांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मार्गावरून रोज दोन ते तीन लाख प्रवासी जात असतात. प्रमुख मार्गावरील असणारा अंधार पाहून प्रवासीही नाराजी व्यक्त करू लागले आहेत. रात्री अंधारामुळे किरकोळ अपघात होऊन वाहतूककोंडी निर्माण होते. वाहनांच्या मोठ्या रांगा टोलनाक्यापर्यंत लागत असून, अशीच स्थिती राहिली तर गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.वाशी खाडीपुलाचे बांधकाम केल्यानंतर टोलनाका सुरू केला आहे. मुंबईत जाणाºया व येणाºया प्रत्येक वाहनाकडून टोल वसुली केली जात आहे. टोलनाक्यापासून काही मीटर अंतरावर अंधार आहे. यामुळे वाहनधारक नाराजी व्यक्त करू लागले आहेत.गंभीर अपघात झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. खाडीपुलावरील अंधार लवकर दूर करावा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशाराही प्रवासी व वाहनधारकांनी दिला आहे.>पुलाची सुरक्षाही धोक्यातवाहतूक सुरळीत राहण्यासाठी खाडीपुलावरील दिवे सुरू असणे आवश्यक आहे. याहीपेक्षा पुलाच्या सुरक्षेसाठीही येथे रात्री पथदिवे सुरू असणे आवश्यक आहे. पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रमाणही वाढत आहे. या सर्व गोष्टी पाहता येथील पथदिवे तत्काळ सुरू करणे आवश्यक आहे.>पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्षवाहतूक पोलिसांनी खाडीपुलावरील अंधाराविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक पत्र दिले आहेत. अंधार असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याशिवाय किरकोळ अपघातामुळे वाहतूककोंडी होऊन कर्मचाºयांवर ताण निर्माण होत आहे; परंतु या पत्रांकडेही दुर्लक्ष केले जात आहे.
वाशी खाडीपुलावर अपघाताचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 11:20 PM