रेल्वेप्रवाशांवर अपघाताची टांगती तलवार; छताला तडे गेल्याने कोसळण्याचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 12:19 AM2019-12-12T00:19:19+5:302019-12-12T00:20:41+5:30
सानपाडा स्थानकातील प्रकार
नवी मुंबई : शहरातील रेल्वेस्थानकांच्या इमारती डागडुजीअभावी प्रवाशांच्या गैरसोयीच्या ठरत आहेत. अशातच फलाटावरील छताचे बिमही कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. सानपाडा स्थानकातील या प्रकारामुळे त्या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मृत्यूची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
नवी मुंबईतील रेल्वेस्थानकांच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत आहे. परिणामी, अनेक रेल्वेस्थानकांच्या इमारतींमध्ये पडझड सुरू आहे, तर काही स्थानकांना अवकळा आली आहे. अशातच रेल्वेस्थानकाच्या छतालाही तडे गेले असून, त्याकडेही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची बाब दिसून येत आहे.
सानपाडा स्थानकात फलाट क्रमांक-१ वर हा प्रकार पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी फलाटावरच असलेल्या छताच्या बिमला मध्यभागी तडे गेल्याचे दिसून येत आहे. एकापेक्षा अनेक बिमची अशी अवस्था झालेली आहे. त्या ठिकाणच्या पत्र्यांनाही भेगा पडलेल्या असल्याने पावसाळ्यात फलाटावर सर्वत्र पावसाच्या पाण्याच्या धारा लागलेल्या असतात. यामुळे प्रतिवर्षी पावसाळ्यात रेल्वेप्रवाशांना फलाटावरही पाऊसधारांचा अनुभव मिळत आहे. अशातच छताच्या बिमला तडे गेल्याच्या प्रकारामुळे त्यांच्यावर मृत्यूची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
वाशी-ठाणे मार्गावरील फलाटावर हा प्रकार पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणावरून दररोज नोकरी-व्यवसायानिमित्ताने लाखो रेल्वेप्रवासी प्रवास करत असतात. अशा वेळी छताच्या बिमचा एखादा भाग धावत्या रेल्वेवर पडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. यामुळे रेल्वेप्रवाशांकडून भीती व्यक्त होत आहे; परंतु मागील अनेक महिन्यांपासून बिमला तडा गेल्याचे पाहायला मिळत असतानाही त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचाही संताप रेल्वेप्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
या प्रकारावरून रेल्वेस्थानकांच्या डागडुजीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईतल्या बहुतांश रेल्वेस्थानकांमध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. सिडकोने बांधलेली ही रेल्वेस्थानके रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया मागील अनेक महिन्यांपासून रखडली आहे.यामुळे दोन्ही प्रशासनांकडून रेल्वेस्थानकांमधील आवश्यक कामांकडे अपेक्षित असे लक्ष दिले जात नसल्याचाही प्रवाशांचा आरोप आहे.