नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर वाशी येथे बुधवारी सकाळी झालेल्या अपघातामध्ये पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सिग्नल बंद केल्यामुळे व मागणी करूनही स्पीड ब्रेकर न बसविल्यामुळे अपघात झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.महामार्गावर वाशी येथे वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. या ठिकाणी भुयारीमार्गाला जागून जोडरस्ता बनविण्यात यावा. बंद केलेला सिग्नल पुन्हा सुरू करावा व स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वारंवार निवेदन देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेने सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले होते. भविष्यात अपघात झाल्यास त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही दिला होता. यानंतरही प्रशासनाने दुर्लक्ष केले. बुधवारी सकाळी रस्ता ओलांडत असलेल्या विश्वनाथ वारियार यांना अज्ञात वाहनाने धडक दिली.या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाविषयी नागरिकांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका फशीबाई भगत, युवक काँग्रेसचे अध्यक्ष निशांत भगत व नागरिकांनी वाशी पोलीस स्टेशनला निवेदन दिले. निष्काळजीपणा करणा-या अधिका-यांवरही कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनाही याविषयी निवेदन दिले आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाशीगाव येथील सिग्नल तत्काळ सुरू करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी स्पीड ब्रेकरही बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
सायन-पनवेल महामार्गावर वाशीजवळ अपघात, पादचारी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 11:26 PM