महामार्गावरील पूल की मृत्यूचे दार? ठाणे-बेलापूर मार्गावर सतत घडताहेत अपघात, प्रशासन निद्रावस्थेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 03:02 PM2024-02-16T15:02:17+5:302024-02-16T15:07:04+5:30

ठाणे-बेलापूर मार्गावरील पुलांचे कठडे अपघातांना निमंत्रण देत आहेत.

accidents are happening continuously on thane belapur road the administration is being short sighted | महामार्गावरील पूल की मृत्यूचे दार? ठाणे-बेलापूर मार्गावर सतत घडताहेत अपघात, प्रशासन निद्रावस्थेत 

महामार्गावरील पूल की मृत्यूचे दार? ठाणे-बेलापूर मार्गावर सतत घडताहेत अपघात, प्रशासन निद्रावस्थेत 

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील पुलांचे कठडे अपघातांना निमंत्रण देत आहेत. अनेक पुलांच्या सुरुवातीला सूचनाफलक नसल्याने अचानक दुभाजक समोर आल्याने चालकांचा गोंधळ उडून हे अपघात घडत आहेत. परंतु, सातत्याने अपघात होत असतानाही व वाहतूक पोलिसांनी सूचना करूनही महापालिका प्रशासन अपघात रोखण्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावर होणारे अपघात चिंतेची बाब ठरत आहेत. चालकांच्या चुकीमुळे अथवा रस्त्यावरील परिस्थितीमुळे ते घडत आहेत. त्यामध्ये अनेकांचा मृत्यूदेखील झाला आहे. तर काही अपघातांमध्ये संबंधित वाहनचालकांसोबतच इतर वाहनांमधील प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत.  सातत्याने घडणारे असे अपघात पोलिसांची डोकेदुखी वाढवत आहेत. तर काही ठिकाणे मृत्यूचा सापळाच बनली आहेत.  बेलापूर, उरणफाटा, नेरूळ, कोपरखैरणे व घणसोली इथल्या पुलांचा समावेश आहे. 

पुलाच्या सुरुवातीला सूचनाफलक नसल्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे पुलाच्या ठिकाणी फलक बसवण्याबाबत महापालिकेला कळवण्यात आले आहे. अद्याप ते बसवले नसल्याने पुन्हा स्मरणपत्र दिले जाईल. - बसीत अली सय्यद, वाहतूक पोलिस निरीक्षक, महापे

ठाणे-बेलापूर मार्गावर कोपरखैरणे रेल्वे स्थानकासमोरील उड्डाणपुलावर गुरुवारी ट्रक उलटल्याने वाशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन तास वाहतूककोंडी झाली. 

सायन-पनवेल मार्गावरही अपघात :

सायन-पनवेल मार्गावर सानपाडा व वाशी येथील पुलाच्या सुरुवातीलादेखील दुभाजकाचा अंदाज न आल्याने अनेक अपघात झाले आहेत. त्यापैकी वाशी येथील पुलाच्या सुरुवातीला असलेला काळोख व रस्त्यावरच पसरलेली खडी, समांतर रस्ता अपघातांना निमंत्रण देत आहे.

Web Title: accidents are happening continuously on thane belapur road the administration is being short sighted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.