नवी मुंबई : ठाणे - बेलापूर रोडवर तुर्भे स्टोअर्स परिसरामध्ये प्रतिदिन वाहतूक कोंडी होत आहे. येथे वारंवार अपघात होत आहेत. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव रखडला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईविषयी नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून वेळेत प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
नवी मुंबईमधील महत्वाच्या रोडमध्ये ठाणे बेलापूर रोडचाही समावेश होतो. या रोडवरील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी महापालिकेने रोडचे काँक्रेटीकरण केले आहे. शासनाने या रोडवर दोन उड्डाणपूल व एक भुयारी मार्ग बांधला आहे. परंतु अनेक वर्षांपासून सर्वाधीक वाहतूक कोंडी होत असलेल्या तुर्भे रेल्वे स्टेशन व तुर्भे स्टोअर्स परिसरामध्ये काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. परिसरातील नागरिकांना रस्ता ओलांडून रेल्वे स्टेशनकडे जावे लागत आहे. रस्ता ओलांडताना वारंवार अपघात होत आहे. १३ आॅक्टोबरला टँकरने धडक दिल्याने एक महिलेचा मृत्यू झाला होता. अशाप्रकारचे अपघात येथे वारंवार होत आहेत. सकाळी व सायंकाळी या परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. अर्धा तास व त्याहीपेक्षा जास्त वेळ येथे अडकून रहावे लागत आहे. येथील समस्या सोडविण्यासाठी याठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात यावा अशी मागणी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी वारंवार केली आहे. महापे पुलाचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यानंतर त्यांनाही याविषयी निवेदन देण्यात आले होते. एमएमआरडीए व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी करून पुढील कार्यवाही वेगाने करण्याचे आश्वासनही दिले होते. परंतु अद्याप उड्डाणपूल उभारण्यासाठी काहीही ठोस कार्यवाही झालेली नाही.महापे व घणसोलीप्रमाणे उड्डाणपूलाची उभारणी करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केली आहे. परंतु प्रशासनाने येथे फक्त कार व पादचाऱ्यांसाठी छोटा पूल उभारण्याचा घाट घातला आहे. यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी जैसे थे स्थिती राहण्याची शक्यता आहे. यामुळे सुरेश कुलकर्णी यांनी पोलीस आयुक्त, महापालिका यांना पत्र दिले आहे. या परिसरातील वाहतुकीचा प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावा. प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही तर २२ नोव्हेंबरला रास्ता रोखो करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.हजारो प्रवाशांचा जीव धोक्यातएमआयडीसीमध्ये जाणारे कामगार तुर्भे रेल्वे स्टेशनमध्ये उतरून तेथून शिरवणे ते महापे पर्यंतच्या कारखान्यात कामासाठी जात असतात. तुर्भे नाका, तुर्भे स्टोअर्स, इंदिरानगर, गणपतीपाडा येथील नागरीकही रेल्वेने मुंबई व ठाणेला जाण्यासाठी या रेल्वे स्टेशनचा उपयोग करत असतात. याठिकाणी रस्ता ओलांडून जाताना वारंवार अपघात होत आहेत. हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात असून त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.ठाणे बेलापूर रोडवर तुर्भे स्टोअर्समध्ये उड्डाणपूलाची उभारणी केली पाहिजे. येथील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर रास्ता रोखो करण्यात येईल.- सुरेश कुलकर्णी, नगरसेवक