बडोदा बँकेच्या खातेदारांनी घेतली ग्राहक मंचाकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:33 AM2019-11-13T00:33:45+5:302019-11-13T00:33:48+5:30

जुईनगर येथील बडोदा बँकेच्या ग्राहकांनी ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रार केली आहे.

The account holders of Baroda Bank rushed to the consumer forum | बडोदा बँकेच्या खातेदारांनी घेतली ग्राहक मंचाकडे धाव

बडोदा बँकेच्या खातेदारांनी घेतली ग्राहक मंचाकडे धाव

Next

नवी मुंबई : जुईनगर येथील बडोदा बँकेच्या ग्राहकांनी ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रार केली आहे. बँकेवर पडलेल्या दरोड्याच्या घटनेला दोन वर्षे होऊनही गुन्ह्यातील जप्तीचा ऐवज अद्यापही ग्राहकांना परत मिळू शकलेला नाही. यामध्ये बँकेची उदासीनता व निष्काळजी असल्याने ग्राहकांनी बँकेविरोधात तक्रार केली आहे.
सुमारे २५ फूट लांबीचे भुयार खोदून बडोदा बँक लुटल्याची घटना जुईनगर येथे १३ नोव्हेंबर २०१७ ला उघडकीस आली होती. या घटनेच्या कित्येक दिवस अगोदर गुन्हेगारांकडून दरोड्याचा कट रचला जात होता. त्याकरिता बँकेपासून चौथ्या क्रमांकाचा गाळा भाड्याने घेऊन त्यामधून थेट बँकेच्या लॉकर रूमपर्यंत भुयार खोदण्यात आले होते. याकरिता सराईत गुन्हेगारांच्या टोळीने बँकेच्या लॉकर रूमची रेकीही केली होती. भुयार खोदून बँक लुटल्याचा देशात दुसऱ्या प्रकारचा हा दरोडा असल्याने या घटनेवरून बँकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या गुन्ह्यात आजपर्यंत पोलिसांनी एकूण १४ जणांना अटक केलेली असून, त्यापैकी एकाचा अटकेत असताना वर्षभरापूर्वी मृत्यू झाला आहे. तर एक जण गुन्ह्यानंतर फरार असतानाच मृत पावलेला आहे. या गुन्ह्यात सुमारे चार कोटींचा ऐवज लुटला गेलेला असून, त्यापैकी सुमारे दोन कोटींचा ऐवज जप्त करण्यात पोलिसांना यश आलेले आहे. बँकेच्या लॉकर रूममधील लॉकरचे स्कू्र खोलून त्यामधील ऐवज चोरण्यात आला होता. यामुळे बँकेच्या लॉकर ग्राहकांच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान ऐवज चोरीला गेला होता. अनेकांनी त्यांच्या मुलामुलींच्या लग्नासाठी हा ऐवज जमा करून ठेवला होता. त्यामुळे गुन्हेगारांना पकडल्यानंतर जप्त केलेला ऐवज संबंधितांना परत मिळावा, यासाठी ग्राहकांनी बँकेसह पोलिसांकडे प्रयत्न चालवले होते; परंतु बँकेने जबाबदारी ढकलल्यामुळे जप्तीचा ऐवज अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आहे. तो मिळवण्यासाठी तसेच बँकेच्या विरोधात ग्राहकांनी सीबीडी येथील ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रार केली आहे. त्याशिवाय जिल्हा न्यायालयातही सात तक्रार अर्ज करण्यात आले आहेत. बँकेकडून सुरक्षेत झालेल्या हलगर्जीमुळे हा गुन्हा घडल्याचे तक्रारीत म्हटण्यात आले आहे. त्याशिवाय बँकेकडून आरबीआयच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन झाल्याचेही मुद्दे मांडण्यात आले आहेत. याकरिता तक्रारदारांच्या वकिलांनी आरबीआयकडून तसेच इतर बँकांकडून माहिती अधिकारातून मिळवलेले मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत.
>जुईनगर येथील दरोडा प्रकरणात बडोदा बँकेचा हलगर्जीपणा दिसून आलेला आहे. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन होत असतानाही आरबीआयनेही बँकेवर कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे. तर ग्राहकांच्या चोरीला गेलेल्या मुद्देमालाबाबत बँक जबाबदारी ढकलत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वतीने बँकेविरोधात ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रार करण्यात आली आहे.
- अ‍ॅड. स्वप्निल कदम,
तक्रारदारांचे वकील

Web Title: The account holders of Baroda Bank rushed to the consumer forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.