नवी मुंबई : पाठपुरावा करूनही प्रभागामधील विकासकामे मार्गी लागत नाहीत. प्रशासनाकडून फक्त आश्वासने मिळत असून प्रत्यक्ष कामे होत नसल्याबद्दल नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. कामे करताना पक्षपात केला जात असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला.नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभा व स्थायी समितीमध्ये दोन महिन्यांपासून जास्तीत जास्त विकासकामांचे प्रस्ताव मार्गी लावण्यासाठीची घाई सुरू आहे. अनेक प्रभागांमधील प्रस्ताव मंजूर झालेले नसून त्याचे पडसाद मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये उमटले. कोपरखैरणेमधील शिवसेना नगरसेविका मेघाली राऊत यांनी त्यांच्या प्रभागामध्ये कामे होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. आम्ही चार वर्षांपासून अनेक कामांसाठी वारंवार पाठपुरावा करत आहोत; पण प्रशासनाकडून फक्त आश्वासने दिली जात आहेत. अॅड. भारती पाटील यांनीही कामे होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. आम्ही सनदशीर मार्गाने पाठपुरावा करत असतो; पण प्रशासनाकडून कामे केली जात नाहीत. आमच्या प्रभागामधील प्रस्ताव कधी चर्चेला येणार अशी विचारणाही त्यांनी या वेळी केली. डॉ. जयाजी नाथ यांनीही, विकासकामांची फाइल एक टेबलवर किती दिवस थांबलेली असते, याची माहिती घेतली जावी, आम्ही सभागृहात आवाज उठवितो त्यामुळे आमची कामे होत नाहीत का, असेही त्यांनी या वेळी विचारले.सभागृहनेते रवींद्र इथापे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. पूर्वीच्या आयुक्तांनी ज्या कामांची पाहणी केली. त्या कामांसाठीही पुन्हा जागेवर जाऊन पाहणी करायची आवश्यकता आहे का? किती प्रस्ताव मंजुरीसाठी शिल्लक आहेत. याची पाहणी करावी व बुधवारी ते प्रस्ताव मंजुरीसाठी आणावे, अशा सूचना दिल्या. सभापती नवीन गवते यांनीही शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांना सर्वांची कामे झाली पाहिजेत, अशा सूचना दिल्या.>७१ कोटींच्या कामांना मंजुरीस्थायी समितीमध्ये मंगळवारी तब्बल ७१ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये रोडचे डांबरीकरण, पदपथ दुरुस्ती व इतर कामांचा समावेश आहे. नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी, जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न सुरू असून सहा महिन्यांत अडीच हजार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली असल्याचे निदर्शनास आणून दिले.>आयुक्तांकडे बैठकस्थायी समितीची बैठक झाल्यानंतर सभापती नवीन गवते, सभागृहनेते रवींद्र इथापे यांचीही आयुक्तांबरोबर बैठक झाली. या बैठकीमध्येही शहरातील विकासकामांविषयी चर्चा करण्यात आली. आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्यासाठी दोन दिवसांमध्ये पुन्हा स्थायी समितीची बैठक लावण्यात येणार आहे.
विकासकामांमध्ये पक्षपात होत असल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:45 PM