नवी मुंबई : उलवे येथील सोनाराने ग्राहकांचे पैसे व दागिने घेऊन पळ काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोनारावर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उलवे सेक्टर २० येथील स्वर्णाशिल्पी ज्वेलर्स चालकाकडून ग्राहकांच्या फसवणुकीची घटना घडली आहे. याप्रकरणी विकास जैन व महावीर जैन यांच्या विरोधात एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे परिसरातील अनेक नागरिकांनी नवे दागिने खरेदी केले होते. शिवाय काहींनी जुन्या दागिन्यांमध्ये भर टाकून नवे दागिने बनवण्यासाठी दिले होते. अशाच प्रकारे तक्रारदार फातिमा मोमिन, तुषार पवार, अजय चौधरी, साक्षी सिंग व शहाणा राजगुरू आदींनी देखील त्याच्यासोबत व्यवहार केला होता. त्यापैकी काहींना हॉलमार्क नसलेले दागिने देण्यात आले होते.
ग्राहकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ते दागिने परत करून हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची मागणी केली होती. याचदरम्यान गतमहिन्यात दुकान बंद आढळून आल्यानंतर आजतागत दोघांसोबत कसलाही संपर्क झाला नाही. यावरून त्यांनी पोबारा केल्याचे स्पष्ट होताच आपली फसवणूक झाल्याची तक्रार नागरिकांनी एनआरआय पोलिसांकडे केली आहे. त्याद्वारे गुरुवारी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.