चोरीचे ३४ मोबाइल जप्त करत आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 01:38 AM2020-11-25T01:38:23+5:302020-11-25T01:38:50+5:30
उलवेमधील घटना : गुन्हेगारी पार्श्वभूमी
नवी मुंबई : घरफोडीप्रकरणी एनआरआय पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून उलवेमधील एक गुन्हा उघड झाला असून त्यामधील चोरीचे ३४ मोबाइल जप्त केले आहेत. तरूणाची बालवयापासून गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.
उलवे येथील बंद घरात घरफोडी झाल्याची घटना गुरुवारी घडली होती. मोबाइल दुरुस्तीचे काम करणाऱ्या व्यक्तीच्या घरी हा गुन्हा घडला होता. त्यामध्ये दुरुस्तीसाठी ठेवलेले ३४ मोबाइल चोरीला गेले होते. या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी तपास पथक नेमले होते. त्यांच्या तपासादरम्यान अक्षय मनावर (२०) हा पोलिसांच्या हाती लागला. तो उलवेचा राहणारा आहे. चौकशीत त्याने उलवे येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. यामधील ३४ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. अक्षय याआधीही एका गुन्ह्यात होता. मात्र अल्पवयीन असल्याने त्या वेळी अटक टळली होती. त्याने मागील तीन वर्षांत इतरही गुन्हे केल्याची शक्यता असून एनआरआय पोलीस अधिक तपास करत आहेत.