नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर एसरफोर्सचे सी 295 विमान विसावले ; मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत यशस्वी चाचणी

By वैभव गायकर | Published: October 11, 2024 03:19 PM2024-10-11T15:19:22+5:302024-10-11T15:21:20+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

Acerforce C295 aircraft lands at Navi Mumbai International Airport A successful test in the presence of the Chief Minister | नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर एसरफोर्सचे सी 295 विमान विसावले ; मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत यशस्वी चाचणी

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर एसरफोर्सचे सी 295 विमान विसावले ; मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत यशस्वी चाचणी

वैभव गायकर,पनवेल:देशातील पहिल्या ग्रीन फिल्ड विमानतळ म्हणुन ओळख निर्माण केलेल्या नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दि.11 रोजी एअरफोर्सच्या सी 295   विमानाची यशस्वी चाचणी पार पडली. यावेळी लँड झालेल्या या विमानाला अग्निशमन दलाच्या वतीने वाटर कॅनलद्वारे सलामी देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

विमानतळावर यावेळी सुखोई विमानाच्या घिरक्या देखील खास आकर्षण ठरले.पुढील वर्षी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतलावरून प्रवासी सेवा कार्यान्वित होणार आहे.चार टर्मिनल याठिकाणी कार्यान्वित असणार असून याठिकाणाहून कार्गो वाहतूक सेवेला सर्वप्रथम सुरुवात होणार आहे.डिसेंबर अखेर कार्गो वाहतूक सेवेला सुरुवात होणार आहे .वर्षभरात सुमारे  9 कोटी प्रवासी प्रवास करतील तर 2.6 दशलक्ष टन कार्गो वाहतुक कार्यान्वित राहणार आहे.विधानसभेची आचारसंहिता काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने राज्य शासनाने विकासकामांच्या उदघाटनाची धडाका लावला आहे.त्याचाच भाग म्हणुन देशातील सर्वात मोठ्या नवी मुंबई विमानतळावर विमानाची यशस्वी चाचणी राज्य शासनाच्या पुढाकाराने पार पाडण्यात आली.

या कार्यक्रमाला केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ,खासदार सुनील तटकरे,सिडको अध्यक्ष संजय शिरसाठ ,आमदार गणेश नाईक,आमदार प्रशांत ठाकूर,आमदार मंदा म्हात्रे ,आमदार महेश बालदी,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे ,आदी उपस्थित होते.नवी मुंबई विमानतळाला  जोडणाऱ्या सर्व प्रवासी वाहतुक यामध्ये मेट्रो,जलमार्ग तसेच रस्ते वाहतुकीचे काम देखील युद्धपातळीवर सुरु आहे.नियोजन वेळेत हे विमानतळ पूर्ण होईल अशी आशा यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

 नवी मुंबई विमानतळावर दोन रनवे आणि चार टर्मिनल असणार आहेत.त्यामुळे देशातील सर्वांत मोठ्या या विमानतळामुळे मुंबई आणि महाराष्ट्राच्या मोठी गती मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अजितदादांची दांडी -

नवी मुंबई विमानतळाच्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारली त्यांच्या ऐवजी या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे उपस्थित होते.

फ्लाईट आणि फाईटसाठी तयार -

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा करिष्मा दिसून आला.त्यांनतर हरयाणा लोकसभेत देखील मोदी विरोधकांना धुळ चारण्यात आली असल्याने आम्ही फ्लाईट आणि फाईट साठी तयार असल्याचे सांगत आगामी विधानसभेसाठी आम्ही सज्ज असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केले.

विरोधक टीका करीत राहिले -

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ सुरु होणार नाही अशी टीका आमच्यावर विरोधक करीत होते मात्र आम्ही विमानतळ पूर्ण करून आज रनवेवर विमानाची यशस्वी चाचणी देखील केली असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.

दिबांचा सन्मान करणार -

आम्ही जे बोलतो ते करतो त्यानुसार स्थानिकांसाठी लढा देणारे नेता दिबा पाटील यांचा नाव विमनाताळाला देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा सकारात्मकता दाखवली असली तरी हे नाव नेमकं कधी दिल जाणार याबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलणे टाळल्याचे यावेळी दिसून आले.

Web Title: Acerforce C295 aircraft lands at Navi Mumbai International Airport A successful test in the presence of the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.