राधाकृष्ण नार्वेकर यांना आचार्य अत्रे पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 12:55 AM2019-07-16T00:55:09+5:302019-07-16T00:55:16+5:30
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा आचार्य अत्रे पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांना जाहीर झाला आहे.
नवी मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा आचार्य अत्रे पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांना जाहीर झाला आहे. याबाबतची घोषणा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी केली. आचार्य अत्रे जयंतीच्या दिवशी, १३ आॅगस्ट रोजी नार्वेकर यांना हा पुरस्कार देण्यात येईल.
मराठी पत्रकारितेत पाच तप कार्यरत राहिलेल्या नार्वेकर यांनी विविध वृत्तपत्रांत बातमीदार, संपादक, सल्लागार संपादक या पदांवर आपला ठसा उमटवला आहे. संपादक पदावरून निवृत्त झाल्यावर नार्वेकर यांनी लिहिलेले सेवानिवृत्त झालात, आता पुढे काय? हे पुस्तक लोकप्रिय ठरले. उर्दू भाषेत त्याचे भाषांतर झाले आहे. हिंदी व इंग्रजी भाषेतही भाषांतर झाले आहे. लवकरच त्याचे प्रकाशन होईल. त्यांनी लिहिलेले ‘मनातली माणसं’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मुंबईतील अनेक नामवंत पत्रकार आणि संपादक घडविण्यासाठी नार्वेकर यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे.
माथाडी कामगारांना त्यांचे हक्क मिळावे, गिरणी कामगारांना न्याय मिळावा नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचे रक्षण व्हावे, वसई, विरार, मुरबाड, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, शहापूर या शहरांच्या विकासाकरिता विशेष पुरवण्या प्रकाशित करून या शहरांच्या विकासातील आपली जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. त्यांनी केलेल्या कामाची दखल शासन पातळीवरदेखील घेतली गेली आहे. दूरदर्शनचा नवरत्न पुरस्कार त्यांना मिळाला आहे.