मधुकर ठाकूर -
उरण : तालुक्यातील वेश्वी गावात ॲसिड टाकून १२ कुत्र्यांना गंभीर दुखापती करणाऱ्या अज्ञात माथेफिरूंवर पंधरा दिवसांनंतरही गुन्हा नोंद करण्याचे सोडाच, या प्रकरणाची कोणतीही गंधवार्ताही उरण पोलिसांना नसल्याने चिंता व्यक्त केली जात असून प्राणी मित्रांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पंधरा दिवसांपूर्वी उरण तालुक्यातील वेश्वी गावात १२ भटक्या कुत्र्यांवर ॲसिड टाकून त्यांना गंभीरपणे जखमी करण्याचा निंदनीय तितकाच संतापजनक प्रकार घडला होता. येथील रहिवासी असलेल्या प्राणीप्रेमी रश्मी माधवी यांना एका जखमी कुत्र्याला अन्नपाणी देत असताना आणखी १२ गंभीरपणे जखमी झालेली भटकी कुत्री आढळून आली. माधवी दांपत्यानी पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या नवी मुंबईतील हॅडस दॅट ॲनिमल फाउंडेशनच्या संस्थापिका अनामिक चौधरी यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.अंगावर ॲसिड टाकल्यामुळे अत्यंत गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या
भटक्या कुत्र्यांना उपचारासाठी हॅडस दॅट ॲनिमल फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आले आहे. भटक्या कुत्र्यांवर ॲसिड टाकण्याचा निंदनीय तितकाच संतापजनक प्रकार काही अज्ञात माथेफिरूंनी जाणीवपूर्वक केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मात्र संतापजनक प्रकाराची उरण पोलिसांना खबर अद्यापही लागलेली दिसत नाही.त्यामुळे या प्रकरणी पंधरा दिवसानंतरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.यामुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.