लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत १,०२७ जणांवर कारवाई करून, त्यांच्याकडून १ लाख ३२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. भाजीपाला, फळ व धान्य मार्केटमध्ये नियमांचे सर्वाधिक उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
एपीएमसी मार्केटमध्येही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. येथील पाच मार्केटमध्ये जवळपास एक लाख नागरिकांचा प्रतिदिन वावर असतो. मुंबई, नवी मुंबईमधील किरकोळ व्यापारी येथे खरेदीसाठी येत असतात. कोरोनामुळे मार्केटमधील अनेक प्रतिथयश व्यापाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. यामुळे बाजारसमितीने सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. प्रवेशद्वारावर तापमान व आॅक्सिजन तपासणीची सोय केली आहे. मार्केटमध्ये वेळोवेळी औषध फवारणी केली जात आहे. वाहनांचेही निर्जंतुकीकरण केले जात आहे. सद्यस्थितीमध्ये पाचही मार्केट पहिल्याप्रमाणे सुरू आहेत. मार्केटमध्ये सुरक्षेसाठी सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन केले आहे, परंतु यानंतरही अनेक कामगार, व्यापारी व ग्राहकही मास्कचा वापर करत नाहीत. नियम तोडणाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना सचिव अनिल चव्हाण यांनी दिल्या आहेत.
सुरक्षा विभागाच्या वतीने नियमित कारवाई केली जात आहे. यानंतरही अद्याप अनेक जण मास्कचा वापर करत नसल्याचे निदर्शनास आले असून, प्रशासनाकडून कारवाईचे प्रमाण वाढविण्याची मागणी होत आहे.