विनाहेल्मेट १,३०० दुचाकीस्वारांवर कारवाई, वाहतूक पोलिसांची पामबीच मार्गावर मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 01:46 PM2021-10-30T13:46:02+5:302021-10-30T13:46:28+5:30
Navi Mumbai : पामबीच मार्गावर वेगात कार पळवल्या जात असल्याच्या तक्रारी वाहतूक पोलिसांकडे प्राप्त होत होत्या. त्याद्वारे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पामबीच मार्गावरील सीसीटीव्ही तपासून ६ स्पोर्ट्स कारचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
नवी मुंबई : पामबीच मार्गावर विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी कारवाई केली. त्यामध्ये १३०० दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली असून, स्पोर्ट्स कारच्या रेस लावणाऱ्या ६ गाड्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही वाहतूक पोलिसांकडून अशा प्रकारे मोहीम राबवून कारवाया केल्या जाणार आहेत.
पामबीच मार्गावर वेगात कार पळवल्या जात असल्याच्या तक्रारी वाहतूक पोलिसांकडे प्राप्त होत होत्या. त्याद्वारे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पामबीच मार्गावरील सीसीटीव्ही तपासून ६ स्पोर्ट्स कारचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. हे कार चालक एकत्र जमून इतर वाहनचालकांना धोका निर्माण करून वेगात कार पळवायचे.
अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक शाखा पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी शुक्रवारी पामबीच मार्गावर विशेष मोहीम राबवली. त्यासाठी उपायुक्त कराड, सहायक आयुक्त दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांची विविध पथके तयार करण्यात आली होती. त्यामध्ये १३०० दुचाकीस्वारांवर विनाहेल्मेट वावरताना आढळून आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
अपघातांचे प्रमाण वाढल्याने निर्णय
विना हेल्मेट दुचाकी स्वारांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे, तसेच अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. हेल्मेट परिधान न केल्यास जीवितहानी होण्याचीही शक्यता असते. याचमुळे पोलिसांकरवी ही कारवाई करण्यात येत आहे.