ध्वनिप्रदूषण करणा-या १९ मंडळांवर कारवाई, विसर्जनादरम्यान नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 05:39 AM2017-09-03T05:39:28+5:302017-09-03T05:39:47+5:30
विसर्जनादरम्यान डी.जे. अथवा डॉल्बी वाजवून ध्वनिप्रदूषण करणा-या १९ गणेशोत्सव मंडळांवर परिमंडळ पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक कारवाया वाशी विभागात झाल्या आहेत.
नवी मुंबई : विसर्जनादरम्यान डी.जे. अथवा डॉल्बी वाजवून ध्वनिप्रदूषण करणाºया १९ गणेशोत्सव मंडळांवर परिमंडळ पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक कारवाया वाशी विभागात झाल्या आहेत. पोलिसांनी सूचना करूनही नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक वाजवल्याप्रकरणी या मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत.
गणरायाच्या विसर्जनादरम्यान डी.जे. अथवा डॉल्बी वाजवून ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी पोलिसांकडून घेण्यात आली आहे. त्याकरिता सर्वच गणेशोत्सव मंडळांना न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना गणेशोत्सवापूर्वीच पोलिसांनी केल्या आहेत. यानंतरही काही मंडळांकडून पोलिसांच्या सूचनांना बगल देण्याचे प्रकार घडत आहेत. परिमंडळ १मधील अशा १९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. श्रीगणेशाच्या विसर्जनादरम्यान मर्यादेपेक्षा जास्त आवाजाने ध्वनिक्षेपक वाजवल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाया केल्या असल्याचे उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी सांगितले. या सर्व मंडळांवर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक कारवाया वाशी पोलिसांनी केल्या आहेत. वाशी पोलीस ठाणे ९, एपीएमसी, रबाळे, रबाळे एमआयडीसी व सीबीडी पोलीस ठाण्यात प्रत्येकी १ तर नेरूळ पोलीस ठाण्यात ४ व कोपर खैरणे पोलीस ठाण्यात २ गुन्हे दाखल आहेत. अशीच कारवाई अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाºया विसर्जनापर्यंत सुरूच राहणार आहे. विसर्जनाची प्रक्रिया शांततेत व शिस्तबद्ध व्हावी याकरिता पोलीस प्रयत्नशील आहेत. यादरम्यान ध्वनिप्रदूषण होणार नाही याची खबरदारीही मंडळांनी घेणे गरजेचे आहे. तशा सूचनादेखील पोलिसांनी केल्या आहेत. यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाईच्या उद्देशाने पोलीस ठाणे अंतर्गत पथके तयार करण्यात आली आहेत. विसर्जनस्थळाच्या मार्गावर जाणाºया प्रत्येक गणेशोत्सव मंडळाकडून वाजवल्या जाणाºया ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा तपासली जात आहे.