मोकळ्या मैदानामागे उभ्या केलेल्या ७१ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 11:50 PM2021-01-10T23:50:01+5:302021-01-10T23:50:19+5:30
कोपरखैरणेत ११ वाहने जप्त : नवी मुंबईत राबविणार मोहीम
नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरातील मोकळ्या मैदानामागे उभ्या असणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये एकूण ७१ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी ११ वाहने जप्त करण्यात आली आहे. सिडकोच्या नियोजनातील त्रुटीमुळे कोपरखैरणेतील रहिवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मागील दहा वर्षात चाळीचे रूपांतर तीन मजली घरांमध्ये झाल्याने लोकसंख्येत वाढ झाली आहे. तर आर्थिक प्रगतीमुळे घरोघरी वाहनांचीदेखील संख्या वाढत आहे. मात्र ही वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने ती खेळाच्या मैदानात उभी केली जात आहेत. याचा त्रास तरुणांच्या मैदानी खेळांवर होत आहे. तसेच, मैदानाच्या डागडुजीवर होणार खर्च पाण्यात जात आहे. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करून मैदाने मोकळी करण्याची मागणी होत आहे. त्यानुसार पालिकेने खेळाच्या मैदानांमध्ये उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत कोपरखैरणे परिसरात ७१ वाहनांवर कारवाई करण्यात आली असल्याचे विभाग अधिकारी अशोक मढवी यांनी सांगितले. त्यापैकी ३५ वाहनांवर कारवाई करून कारवाई शुल्क स्वरूपात एकूण १७ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. तर ११ वाहने जप्त करून ती जमा करून घेण्यात आली आहेत. त्याशिवाय बेवारस स्थितीत उभ्या असणाऱ्या २५ वाहनांना नोटीस बजावण्यात आली आहे. दोन दिवसात ही वाहने संबंधितांनी न हटवल्यास ती जप्त केली जाणार आहेत. जप्त केलेली ही वाहने ठेवण्यासाठी वापरात नसलेल्या महापे येथील डेपोच्या जागेचा वापर होणार आहे.
शहर स्वच्छतेसाठी पालिकेची पावले
शहर स्वच्छतेच्या दृष्टीने पालिकेने मोहीम हाती घेतली आहे. त्यात अनधिकृत बॅनरबाजीलाही आळा घातला जाणार आहे. शहरात विनापरवाना झळकणारे अथवा मुदत संपूनही तसेच असणारे बॅनर हटवले जाणार आहेत. तशा सूचना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्व विभाग कार्यालयांना केल्या आहेत.