लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी शहरातील बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणांच्या विरोधात कंबर कसली आहे. सोमवारी ऐरोली विभागात धडक मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत पक्क्या अनधिकृत बांधकामांसह सुमारे ८00 अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. एमआयडीसीच्या संयुक्त सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आली. महापालिकेच्या या दणक्याने अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील बेकायदा बांधकामांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. गाव- गावठाणातील अनधिकृत बांधकामांसह बेकायदा झोपड्या, फेरीवाले, मार्जिनल स्पेसवरील अतिक्रमणे हटविली होती. त्यांच्या बदलीनंतर महापालिका आयुक्तपदी विराजमान झालेले रामास्वामी एन. यांनीसुध्दा बेकायदा बांधकामांच्या विरोधात कडक धोरण अवलंबिले आहे. यासंदर्भात सर्व विभाग अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार विभागीय स्तरावर कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला आहे. सोमवारी ऐरोली विभागात संयुक्त कारवाई मोहीम राबविण्यात आली. चिंचपाडा, शंकरनगर आदी भागातील जवळपास ८00 अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांच्या नियंत्रणाखाली सहायक आयुक्त अशोक मढवी, दत्तात्रेय नागरे, प्रकाश वाघमारे, ऐरोली विभागाचे सहायक आयुक्त तुषार बाबर व कार्यकारी अभियंता संजय देसाई आदींच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेसाठी परिसरात शंभरपेक्षा अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
ऐरोलीत ८00 अतिक्रमणांवर कारवाई
By admin | Published: May 09, 2017 1:34 AM