नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने शहरातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांविरोधातील माेहीम अधिक तीव्र केली असून गेल्या वर्षभरात जानेवारीअखेरपर्यंत २०४ बांधकामे आणि १७३० झोपड्यांसह एक लाख ८ हजार १४३ फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. येत्या वर्षभरात अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामविरोधातील माेहीम अशीच तीव्र राहणार असल्याचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले आहे.
नवी मुंबई हे सिडकोने वसविलेले सुनियोजित शहर असले तरी येथील सिडको, एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे बांधली आहेत. याशिवाय राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने शहरांत अनधिकृत फेरीवाल्यांचे बस्तान दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील पदपथांसह रस्ते, त्यालगतच्या मोकळ्या जागांवर हे फेरीवाले बिनदिक्कत व्यवसाय करीत आहेत. याबाबत तक्रारी आल्यानंतर महापालिकेकडून कारवाई करण्यात येते. त्यानुसार जानेवारी अखेरपर्यंत एक लाख ८ हजार १४३ फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे.
याशिवाय महापालिका हद्दीत कोणतीही परवानगी न घेता बांधलेल्या बांधकामधारकांना महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम ५३ अन्वये १२५ नोटिसा बजावल्या असून ४७ बांधकामे हटविली आहेत. तसेच अधिनियम ५४ अन्वये ३०३ नोटिसा बजावल्या असून १५७ बांधकामे हटवली आहेत.
२१०३२ होर्डिंग्जवरही केली कारवाई
केवळ झोपडीधारक आणि अनधिकृत बांधकामधारकच नव्हे तर अनधिकृतपणे सामायिक जागेचा वापर करणाऱ्या २३८३ दुकानदारांसह शहरातील रस्त्यांवर जागोजागी बेवारसपणे उभे असलेल्या २००१ वाहने आणि २१०३२ अनधिकृतपणे उभारलेल्या होर्डिंग्ज/बॅनरवर कारवाई केली आहे. जानेवारी अखेरपर्यंत दोन कोटी २० लाखांहून अधिक दंडात्मक शुल्क वसूल केले आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सिडको, एमआयडीसीच्या मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात भूमाफियांनी अतिक्रमणे केली आहेत. याबाबत मुंबई उच्च न्यायालयानेे नुकतीच महापालिकेची कानउघाडणी केली आहे. यामुळे येत्या वर्षभरात शहरातील चार हजारांवर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.