सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईथर्टी फर्स्टचा आनंद साजरा होत असताना अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांतर्फे शहरात नाकाबंदीच्या माध्यमातून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. यादरम्यान आयुक्तालयात ६९२ तळीरामांवर ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाया करण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी मारामारीच्या देखील घटना घडल्या असून त्यांच्यावर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागील काही वर्षांत पार्टी करुनच नववर्षाचे स्वागत करण्याला तरुणांच्या मिळालेल्या पसंतीमुळे थर्टी फर्स्टला उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मात्र मद्यधुंद अवस्थेत होणाऱ्या वादाच्या प्रकारांमुळे थर्टी फर्स्टच्या उत्साहाला गालबोट लागत चालले आहे, तर थर्टी फर्स्टच्या रात्री असे अनुचित प्रकार घडू नयेत याकरिता पोलिसांकडूनही खबरदारीचे उपाय राबवले जात आहेत. त्यानुसार प्रतिवर्षी थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालय क्षेत्रात चोख बंदोबस्त लावला जातो. तर मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांकडून अपघाताच्या घटना घडू नयेत, याकरिता नाकाबंदी करुन ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाया केल्या जात आहेत. त्यानुसार यंदाही ३० डिसेंबरच्या रात्रीपासूनच शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. अशा नाकाबंदीच्या ठिकाणी संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात ड्रंक अँड ड्राईव्हच्या तब्बल ६९२ कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. वाहतूक पोलीस व शहर पोलिसांच्यावतीने संयुक्त नाकाबंदी करुन या कारवाया करण्यात आल्या आहेत. खबरदारीच्या अनुषंगाने आयुक्त व सह आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त, शहर पोलीस व वाहतूक विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक देखील शहरात गस्त घालत होते. त्यांच्याकडून ठिकठिकाणच्या पार्ट्यांमध्ये कायद्याचे उल्लंघन होतेय का यावर बारकाईने नजर ठेवली जात होती. मद्यपान करुन वाहने चालवू नयेत, असे पोलिसांकडून वारंवार आवाहन केले जात आहे. (प्रतिनिधी)