ऐरोलीतील फेरीवाल्यांवर कारवाई; बांधकामे जमीनदोस्त, सिडकोची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 11:52 PM2019-10-31T23:52:16+5:302019-10-31T23:52:33+5:30
भूखंड केला मोकळा
नवी मुंबई : ऐरोली परिसरात उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली असलेल्या मोकळ्या जागेवर अनधिकृत बांधकामे करण्यात येत आहेत. अशा नव्याने सुरू असलेल्या बांधकामांवर तसेच सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या १५० पेक्षा अधिक फेरीवाल्यांच्या शेड्सवर कारवाई करून जमीनदोस्त केल्या. सिडकोच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी ही कारवाई केली.
ऐरोली सेक्टर ८ डी-मार्ट समोरील सिडकोच्या २,८०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या टेंडर प्लॉटवर १५० हून अधिक फेरीवाल्यांनी हातगाड्या तसेच शेड्स उभारून अनेक वर्षांपासून फळे आणि भाजीपाल्याची दुकाने थाटली होती. याबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार सिडकोने गुरुवारी धडक कारवाई केली, यात अनेक हातगाड्या तसेच सामान जप्त करण्यात आले.
ऐरोली-मुलुंड रस्त्यालगत सेक्टर १० येथील उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीखाली नव्याने सुरू असलेले चालू बांधकाम पाडण्यात आले. सिडकोचे अतिक्रमण विभागाचे मुख्य नियंत्रक किसान जावळे यांच्या आदेशानुसार, अतिक्रमण विभागाचे नियंत्रक सुनील तांबे आणि प्रभारी नियंत्रक सुमन कोलगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरेखक सुहास राणे यांनी सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई करून भाजी मंडईचे १५० शेड्स जमीनदोस्त करून भूखंड मोकळा करण्यात आला. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.