लाच घेताना सिडकोच्या महाव्यवस्थापकावर कारवाई; लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई
By सूर्यकांत वाघमारे | Published: August 29, 2023 06:25 PM2023-08-29T18:25:31+5:302023-08-29T18:26:25+5:30
दहा हजार रुपयांची लाच घेताना सिडकोच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
नवी मुंबई : दहा हजार रुपयांची लाच घेताना सिडकोच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने मंगळवारी दुपारी सापळा रचून ही कारवाई केली. घराच्या फर्स्ट पार्टी डिड ऑफ अपार्टमेंटवर सही करण्यासाठी पैसे मागण्यात आले होते.
जगदीश राठोड (५३) असे कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून ते प्रशासन विभागाचे महाव्यवस्थापक आहेत. त्यांच्याकडे ऐरोली विभागाचा देखील अतिरिक्त कार्यभार आहे. ऐरोली मधील एका घराच्या फर्स्ट पार्टी डिड ऑफ अपार्टमेंट कागदपत्रावर सही करण्यासाठी त्यांनी लाच मागितल्याची तक्रार एका इस्टेट एजंटने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली होती.
त्यानुसार उप अधीक्षक शिवराज म्हेत्रे यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी सीबीडी येथील सिडको भवन मध्ये सापळा रचण्यात आला होता. त्यामध्ये दहा हजार रुपये घेताना राठोड यांच्यावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.