एपीएमसी परिसरातील गुटखा विक्रेत्यांवर कारवाई; पाच जणांवर गुन्हा दाखल
By नामदेव मोरे | Published: November 22, 2023 07:05 PM2023-11-22T19:05:32+5:302023-11-22T19:05:47+5:30
बाजार समितीमध्ये व बाहेरील पानटपऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
नवी मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरील हॉटेल बाहेर असलेल्या गुटखा विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. दिवसभर मोहीम राबवून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पानटपरी सील करून गुटख्याचा साठा जप्त केला आहे.
बाजार समितीमध्ये व बाहेरील पानटपऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनविभागाच्या कोकण सहआयुक्त सरला खटावकर यांनाही याविषयी माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने मंगळवारी सकाळपासून पानटपऱ्यांविरोधात मोहीम सुरू केली. दिवसभर पाच टपऱ्यांमध्ये गुटखा विक्री सुरू असल्याचे आढळले आहे. या प्रकरणी मनोज चौरसासीया, अब्दूल शेख, श्रीकांत दत्ता, भोलानाथ चौरासीया व विरेंद्रकुमार खेलवान या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मॅफ्को मार्केट परिसरातील हॉटेलबाहेरील या पानटपऱ्यांवर कारवाई केली आहे. या प्रकरणी संबंधीतांवर एपीएमसी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.अवैध गुटखा विक्रीविरोधात मोहीम सुरूच ठेवली जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
कायमस्वरूपी कारवाई व्हावी
अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. बाजार समितीमधील मार्केट आवार व बाहेरील कारवाईनंतर सील केलेल्या पानटपरींवर कायमस्वरूपी कारवाई करावी. अनधिकृतपणे व्यवसाय करणारांच्या टपऱ्या हटविण्यात याव्यात व पुन्हा अवैध व्यवसाय सुरू राहणार नाही याची काळजी घेण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.