नवी मुंबई : भारतात विनापरवाना बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी सहा नायझेरियन व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. जुहूगाव येथे भाड्याने जागा घेऊन त्यांच्याकडून हॉटेल चालवले जात होते. त्याठिकाणावरून दारू साठा देखील जप्त करण्यात आला आहे.
नवी मुंबई लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा नायझेरियन व्यक्तींचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यात अनेकजण व्हिजा संपलेला असताना देखील बेकायदा वास्तव्य करत आहेत. अशा व्यक्तींची शोधमोहीम घेण्याच्या सूचना परिमंडळ उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी पोलिसांना केल्या आहेत. त्यानुसार चौकशी दरम्यान जुहूगाव येथे काही नायझेरियन व्यक्ती बेकायदेशीरपणे राहत असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांना मिळाली होती. त्याठिकाणी छापा टाकण्यासाठी निरीक्षक प्रमोद तोरडमल, सहायक निरीक्षक जयंत राजूरकर, प्रशांत तायडे आदींचे पथक तयार करण्यात आले होते.
शुक्रवारी मध्यरात्री या पथकाने जुहूगाव येथील साई दर्शन इमारतीमधील ओझीबिया किचन हॉटेलवर छापा टाकला. यावेळी सहा नाझेरियन व्यक्ती पोलिसांच्या हाती लागल्या. ओबीओरा आनीववेवा (५७) या नायझेरियन महिलेमार्फत हे बेकायदेशीर हॉटेल चालवले जात होते. हॉटेलच्या झडती मध्ये इतर पाच नायझेरियन व्यक्ती भारतात बेकायदा वास्तव्य करताना आढळून आल्या. प्रिन्स ओको जॉन (४९), अहोमो इले हेलेन (४७), चुकुडो लुके उसलोआर (३०), नलोमारिसा कॉसमॉस चिनेन्ये (५०) व ओकेयो तूचुकोआ फिलीप (४३) अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांना पारपत्र कायद्यांतर्गत ताब्यात घेऊन वाशी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून सोळा हजार रुपये किमतीचा अवैध दारू साठा देखील जप्त करण्यात आला आहे.