प्लास्टिक पिशव्यांच्या विरोधात मोहीम तीव्र, पनवेल महापालिकेची धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 02:28 AM2018-06-03T02:28:42+5:302018-06-03T02:28:42+5:30
पनवेल महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणारे व्यापारी आणि त्याचा वापर करणाऱ्यांवर कारवाई मोहीम सुरू केली आहे. निर्बंध असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि वापर करणा-यांवर कारवाई करून महापालिकेने तीन लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, तसेच ९३३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
पनवेल : पनवेल महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणारे व्यापारी आणि त्याचा वापर करणाऱ्यांवर कारवाई मोहीम सुरू केली आहे. निर्बंध असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि वापर करणा-यांवर कारवाई करून महापालिकेने तीन लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, तसेच ९३३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
पनवेल महापालिकेने पर्यावरणाला मारक ठरणाºया प्लास्टिक पिशव्या नष्ट करण्यासाठी धडक मोहीम सुरू केली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका कार्यक्षेत्रात प्लास्टिक पिशव्यांची निर्मिती, विक्री आणि वापरावर कठोर निर्बंध घातले आहेत. असे असले तरी शहरात आजही सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे महापालिकेने या विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत मागील दोन महिन्यांत १३५ व्यापाºयांवर कारवाई करून तब्बल ९३३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे, तसेच संबंधितांकडून तीन लाख ४० हजार ८५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कामोठे, कळंबोली, खारघर, तक्का, पनवेल, नावडे, रोहिंजन, तळोजा या आठ विभागांत ही मोहीम राबविण्यात आली. महापालिकेचे माजी आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या कार्यकाळात पनवेल महापालिका हद्दीत प्लास्टिकबंदीचा ऐतिहासिक ठराव संमत करण्यात आला होता, तेव्हापासून व्यापारी व नागरिकांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्यासाठी जनजगृती करण्यात येत आहे. पर्यावरण विभागाच्या सहायक आयुक्त तेजस्विनी गलांडे, कामोठे विभागाचे अधीक्षक प्रकाश गायकवाड, आरोग्य निरीक्षक भावेश चंदने, कळंबोली विभागाचे अधीक्षक भगवान पाटील, आरोग्य निरीक्षक मनोज चव्हाण, रोहिंजन विभागाचे अधीक्षक संजय देशमुख, आरोग्य निरीक्षक
योगेश कस्तुर आदीच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जात आहे.