नवी मुंबई : एपीएमसी पोलिसांनी ड्रग्स विक्री प्रकरणी दोन महिलांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ६६ हजाराचे मेथॅक्यूलॉन जप्त करण्यात आले आहे. एपीएमसी आवारातील पुनीत कॉर्नरलगतच्या झोपडपट्टीत हि कारवाई केली असून आठवड्यात त्याठिकाणी झालेली तिसरी कारवाई आहे.
एपीएमसी सेक्टर १९ येथील पुनीत कॉर्नर इमारतीलगतच्या एकता नगर झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री होत आहे. त्यामुळे पोलिसांकडून सतत त्याठिकाणी पाळत ठेवून कारवाई केली जाते. परंतु सिडकोच्या भूखंडावर असलेल्या या झोपड्पट्टीवर अनेकदा कारवाई होऊनही झोपड्या हटवण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. त्यावरून तिथे अवैध धंद्यांना थारा देण्यासाठी झोपड्यांना अभय दिले जात असल्याची शंका व्यक्त होत आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच एपीएमसी पोलिसांनी त्याठिकाणी सलग दोन दिवस कारवाई करून ९ लाखाचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यानंतर शुक्रवारी दुपारी पुन्हा वरिष्ठ निरीक्षक अजय शिंदे यांच्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक प्रभाकर शिऊरकर यांच्या पथकाने त्याठिकाणी पाळत ठेवली होती. यावेळी दोन महिला व एका पुरुषाच्या हालचालीवर संशय आला. यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता पुरुषाने पळ काढला.
तर हाती लागलेल्या दोन महिलांच्या झडतीमध्ये त्यांच्याकडे ३ लाख ६६ हजाराचे मेथॅक्यूलॉन हा अमली पदार्थ आढळून आला. त्यानुसार मंजू बीबी फारूक शेख व रशीद अकबर शेख या महिलांसह पळून गेलेला अकबर शेख याच्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर झोपडपट्टी गुन्हेगारीचा अड्डा बनत असल्याने त्यावरील अतिक्रमण हटवावे अशा पोलिसांनी अनेकदा सूचना केल्या आहेत. त्यानंतरही झोपड्या हटवल्या जात नसल्याने त्याठिकाणी ड्रग्स विक्रीचे अड्डे चालत आहेत.