खांदा कॉलनीमधील अनधिकृत मंडईवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 02:03 AM2019-11-07T02:03:58+5:302019-11-07T02:04:35+5:30
भूखंड केला अतिक्रमणमुक्त : पत्र्याचे शेड बांधण्याचे कामही सुरू : सिडकोने राबविली बंदोबस्तामध्ये मोहीम
पनवेल : खांदा कॉलनी सेक्टर ८ मधील सिडकोच्या मालकीच्या भूखंड क्र मांक ११ वरील अनधिकृत मंडईवर सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई केली. पोलीस बंदोबस्तामध्ये येथील फेरीवाल्यांना हटविण्यात आले. पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी भूखंडाभोवती पत्राशेड बांधण्यास सुरुवात केली आहे.
येथील भूखंडावरील टपऱ्या, दोन पार्टी आॅफिस, चिकन, भाजी, फळे, दूध डेअरी आदी दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. येथे सुमारे ५,५०० स्केअर मीटरवर जागेवर सिडको गृहप्रकल्प उभारणार आहे. सिडकोचे एक लाख घरे बांधणीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी एक प्रकल्प या ठिकाणी होणार असल्याने सिडकोच्या मार्फत ही कारवाई करण्यात आली. या वेळी पोलीस व सिडकोचा मोठा फौजफाटा या ठिकाणी उपस्थित होता. कारवाई केल्यानंतर तत्काळ भूखंडाभोवती पत्रे मारण्याचे कामही सिडकोमार्फत त्वरित सुरू करण्यात आले. पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून ही उपाययोजना केली आहे. या वेळी काही प्रमाणात विरोधदेखील दर्शविण्यात आला. दोन जेसीबीच्या साहाय्याने सर्व दुकाने निष्कासित करण्यात आली.अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाचे अधिकारी विशाल ढगे यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली. संबंधित फेरीवाल्यांचे फेरीवाला धोरणांतर्गत सर्वेक्षण होऊनही पुनर्वसन न करता सिडकोने कारवाई केल्याने स्थानिक नगरसेविका सीता पाटील यांनी कारवाईचा निषेध केला. पुनर्वसन न करता अशाप्रकारे फेरीवाल्यांचे वाºयावर सोडणे कितपत योग्य असल्याचा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.
कारवाई सिडकोची; मोर्चा मात्र पालिकेवर
खांदा कॉलनीमधील ही कारवाई सिडकोच्या मार्फत करण्यात आली. मात्र, येथील फेरीवाल्यांनी सेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. या वेळी मोठ्या संख्येने पालिकेच्या प्रवेशद्वारावर गर्दी केली होती. यासंदर्भात पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीसाठी वेळ दिल्याने आंदोलन मागे
घेण्यात आले.