उरण : ‘नैना’ प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर सिडकोने कारवाई सुरू केली आहे. शुक्र वारी वेश्वी येथील वेअर हाउस सिडकोच्या ‘नैना’ प्राधिकरणाच्या अतिक्र मण विरोधी पथकाने कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत गोदाम आणि वेअर हाउसमालकांचे धाबे दणाणले आहेत.
‘नैना’ क्षेत्रात कुठेही कोणतेही बांधकाम करायचे असेल, तर ‘नैना’ प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे. मात्र, उरण तालुक्यातील वेश्वी, दिघोडे, दादरपाडा, गावठाण, जांभूळपाडा या ठिकाणी अनेक विकासकांनी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने विकत घेऊन सिडको आणि ‘नैना’ प्राधिकरणाची परवानगी न घेता मोठमोठे सीएफएस, गोदाम आणि वेअर हाउस बांधले आहेत. नवी मुंबई विमानतळाचे काम झपाट्याने होत असताना सिडकोने आता उरण परिसरातील अनधिकृत गोदामांकडे आपला मोर्चा वळविला आहे. ज्यांनी ‘नैना’ची बांधकाम परवानगी घेतलेली नाही, अशा ‘नैना’ क्षेत्रातील अनेक अनधिकृत गोदामांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने शुक्रवारी एका अनधिकृत वेअर हाउसवर कारवाई करण्यात आली. या पुढेही अशा प्रकारच्या अतिक्र मण विरोधी कारवाई नोटिसा बजावण्यात आलेल्या गोदामांवर केल्या जातील, असे पथकाचे प्रमुख अमित शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, ‘नैना’ बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील गोदामावर करण्यात आलेल्या कारवाईचा वेश्वी परिसरातील ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला आहे. हे वेअर हाउस स्थानिकांच्या रोजगारासाठी उपयुक्त होते. कारवाईचा बडगा येथील शेतकºयांना, कामगारांना देशोधडीला लावण्याचा असल्याचेही ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. वेश्वी ग्रामपंचायतीचे सरपंच अजित म्हात्रे यांनी सिडकोच्या कारवाईबाबत खंत व्यक्त केली आहे.