‘बावखळेश्वर’वरील कारवाई लांबणीवर?

By admin | Published: May 20, 2017 04:47 AM2017-05-20T04:47:53+5:302017-05-20T04:47:53+5:30

पावणे एमआयडीसीतील बावखळेश्वर मंदिरावरील कारवाईला पोलीस बंदोबस्ताचा खोडा बसला आहे. संपूर्ण पोलीस यंत्रणा पनवेल महापालिका निवडणुकीत व्यस्त आहे.

Action on 'Bawkhaleshwar' postponed? | ‘बावखळेश्वर’वरील कारवाई लांबणीवर?

‘बावखळेश्वर’वरील कारवाई लांबणीवर?

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : पावणे एमआयडीसीतील बावखळेश्वर मंदिरावरील कारवाईला पोलीस बंदोबस्ताचा खोडा बसला आहे. संपूर्ण पोलीस यंत्रणा पनवेल महापालिका निवडणुकीत व्यस्त आहे. त्यामुळे या कारवाईसाठी बंदोबस्त देण्यास पोलीस आयुक्तांनी असमर्थता दर्शविल्याचे समजते. याचा परिणाम म्हणून ही कारवाई काही दिवस लांबणीवर पडल्याचे बोलले जात आहे.
बावखळेश्वर मंदिर परिसरातील ३४ एकर जागेची मालकी एमआयडीसीची असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे. त्यानुसार एमआयडीसीने ही जागा ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार एमआयडीसीने काही दिवसांपूर्वी मुख्य प्रवेशद्वार सील करण्याची कारवाई केली होती. त्यानंतर बावखळेश्वर मंदिर आणि परिसरातील जागा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने एमआयडीसीने हालचाली सुरू केल्या आहेत. न्यायालयाने २00७ पूर्वीच्या धार्मिक स्थळांना अभय दिले आहे. परंतु बावखळेश्वर मंदिर २00९ मध्ये उभारले आहे. अशास्थितीत एमआयडीसी हे मंदिर तोडणार की, तसेच ठेवणार याबाबत नवी मुंबईकरांत उत्सुकता लागली आहे. असे असले तरी एमआयडीसी प्रशासन हे मंदिर तोडण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्राने दिली. मंदिराचे बांधकाम हटविण्याचा मुद्दा हा अत्यंत संवेदनशील आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस संरक्षण लागणार आहे. परंतु सध्या पनवेल महापालिकेच्या निवडणुका आहेत. येत्या २४ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा व्यस्त आहे. अशा परिस्थितीत मंदिराचे बांधकाम हटविण्याच्या कारवाईला पोलीस बंदोबस्त उपलब्ध करण्यास पोलीस आयुक्तांनी एमआयडीसीला नकार कळविल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या निवडणुकीनंतरच बावखळेश्वर मंदिराचे बांधकाम हटवून उर्वरित जागा ताब्यात घेण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतल्याचे समजते.

सोशल मीडियावर अभियान : बावखळेश्वर मंदिरावर एमआयडीसी कारवाई करणार, या वृत्ताने शहरात खळबळ उडाली आहे. हे मंदिर जतन व्हावे, यासाठी शहरातील भाविकांनी सोशल मीडियावर मोहीम उघडली आहे. फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपवर मंदिरावरील संभाव्य कारवाईचा निषेध करणाऱ्या पोस्ट फिरत आहेत. तसेच सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदविला जात आहे. कोणत्याही परिस्थितीत मंदिरावर कारवाई होवू देणार नाही, असा संदेश या पोस्टद्वारे प्रसारित केला जात आहे.

Web Title: Action on 'Bawkhaleshwar' postponed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.