जेएनपीएतील सीएफएसमधुन पाच कोटी ७७ लाख किमतीच्या विदेशी सिगारेटचा साठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 10:08 PM2023-12-28T22:08:31+5:302023-12-28T22:08:44+5:30
डीआरआय विभागाची कारवाई
मधुकर ठाकूर
उरण: डीआरआय विभागाने जेएनपीए परिसरातील एका सीएफएसमधुन पाच कोटी ७७ लाख किमतीच्या विदेशी सिगारेटचा साठा जप्त केला आहे.
जेएनपीए परिसरातील एका सीएफएसमध्ये कंटेनर मधुन तस्करी मार्गाने विदेशी सिगारेटचा साठा आला असल्याची गुप्त माहिती खबऱ्याकडून मिळाली होती.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर मुंबई डीआरआय विभागाने संशयित कंटेनर ताब्यात घेऊन त्याची कसून तपासणी केली.तपासणीत संशयित ४० फुटी कंटेनरमध्ये चिंचेच्या नावाखाली विदेशी सिगारेटच्या काड्या पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये मोठ्या शिताफीने लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले.
सिगारेटच्या पेट्या बेमालूमपणे चिंचेच्या पेटीत ठेवल्या होत्या. पेट्याच्या सर्व बाजू चतुराईने चिंचेने झाकल्या होत्या. ३३ लाख ९२ हजार विदेशी सिगारेटच्या काड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
या विदेशी सिगारेटची किंमत पाच कोटी ७७ लाखांच्या घरात आहे.पंधरा दिवसांपूर्वीच जेएनपीए बंदरातील एका कंटेनरमधुन १४ कोटी ६७ लाखांचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला होता.