गुन्हे शाखेची दुचाकीचोरांवर कारवाई, तीन टोळ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 12:39 AM2018-07-07T00:39:33+5:302018-07-07T00:39:53+5:30
मोटारसायकल चोरी करणाऱ्या तीन टोळ्यांना गुन्हे शाखेच्या पथकांनी विविध ठिकाणावरून अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील एकूण १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. एका कारवाई वेळी गुन्हेगाराने पोलिसांवर चाकूने हल्ला करून पळण्याचा प्रयत्न केला होता.
नवी मुंबई : मोटारसायकल चोरी करणाऱ्या तीन टोळ्यांना गुन्हे शाखेच्या पथकांनी विविध ठिकाणावरून अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील एकूण १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. एका कारवाई वेळी गुन्हेगाराने पोलिसांवर चाकूने हल्ला करून पळण्याचा प्रयत्न केला होता.
वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर पाळत ठेवली होती. या दरम्यान कक्ष-२च्या दोघा पोलिसांना दोन टोळ्यांची माहिती मिळाळी होती. यानुसार उपआयुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त अजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक के. आर. पोपेरे यांनी दोन पथकांच्या माध्यमातून कारवाई केली. हवालदार सुनील साळुंखे यांना मिळालेल्या माहितीआधारे पथकाने कळंबोली स्टील मार्केट परिसरात सापळा रचला होता. या वेळी त्या ठिकाणी मोटारसायकलचोरीसाठी आलेल्या गोटीराम शंकर वाघे (२२) याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने दिलेल्या माहिती आधारे त्याचा साथीदार दिनेश हातमोडे यालाही पनवेल परिसरातून अटक करण्यात आली. या वेळी त्याने कारवाई टाळण्यासाठी साथीदार कृष्णा दशरथ भोईर याच्यासह मिळून पोलिसांवर चाकूने हल्ला केला. त्यानंतरही पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता हातमोडे हाती लागला, तर भोईर पळून जाण्यात यशस्वी झाला. अटक केलेल्या दोघांनी परिसरातून चार मोटारसायकल चोरल्याची कबुली देत त्या पोलिसांच्या ताब्यात दिल्या.
त्याच दरम्यान पोलीस शिपाई प्रफुल्ल मोरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे लावलेल्या सापळ्यात रवि रघुनाथ वाघे (२३) उर्फ बेमट्या याला अटक करण्यात आली. तपासात त्याने सात गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडील सात मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या दोन्ही कारवाया वरिष्ठ निरीक्षक के. आर. पोपेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक बी. डी. जगताप, एस. एस. गायकवाड, एस. आर. ढोले, हवालदार सुनील साळुंखे, अनिल पाटील, संजीव पगारे, पोलीसनाईक परेश म्हात्रे, अभय सागळे आदीच्या पथकांनी केल्या आहेत. त्या शिवाय खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक शिरीष पवार यांच्या पथकानेही एका दुचाकी चोराला अटक केली आहे. मोहम्मद आसिफ खालीद असे त्याचे नाव असून तो खैरणेचा राहणारा आहे. चौकशीत त्याने चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या गुन्ह्यातील मोटारसायकल पोलिसांनी जप्त केल्या आहेत.