लाच मागणा-या उपनिरीक्षकावर कारवाई, कोपरखैरणे पोलीस ठाण्यात सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 02:33 AM2017-12-15T02:33:32+5:302017-12-15T02:33:38+5:30

अपघाताची कागदपत्रे देण्यासाठी लाच मागणा-या पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. सुट्टी असतानाही कोपरखैरणे पोलीस ठाण्यात लाच स्वीकारण्यासाठी तो आलेला असताना रंगेहाथ पकडण्यात आले.

Action on the demand for bribe, trap in Koparkhairane police station | लाच मागणा-या उपनिरीक्षकावर कारवाई, कोपरखैरणे पोलीस ठाण्यात सापळा

लाच मागणा-या उपनिरीक्षकावर कारवाई, कोपरखैरणे पोलीस ठाण्यात सापळा

Next

नवी मुंबई : अपघाताची कागदपत्रे देण्यासाठी लाच मागणा-या पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. सुट्टी असतानाही कोपरखैरणे पोलीस ठाण्यात लाच स्वीकारण्यासाठी तो आलेला असताना रंगेहाथ पकडण्यात आले. मयत व्यक्तीच्या मुलाकडे त्याने ५० हजारांची मागणी करून २५ हजारांवर तोडपाणी केली होती.
कैलास मुंबईकर (५४) असे कारवाई झालेल्या कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाचे नाव आहे. जुलै महिन्यात कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीत दिलीप खराटे यांचा अपघाती मृत्यू झाला होता.
याप्रकरणी संबंधिताविरोधात नुकसान भरपाईचा दावा करण्यासाठी त्यांचा मुलगा दीपक यांनी पोलिसांकडे गुन्ह्याची कागदपत्रे मागितली होती. अर्ज करूनही त्यांना आवश्यक कागदपत्रे देण्यात आलेली नव्हती. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात जावून उपनिरीक्षक कैलास मुंबईकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी खराटे यांच्याकडे अपघाताच्या कागदपत्रांसाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. चर्चेअंती तडजोड करून २५ हजार रुपयांमध्ये कागदपत्रे देण्याची त्यांनी तयारी दाखवली होती. याप्रकरणी खराटे यांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार उपअधीक्षक रमेश चव्हाण यांच्या पथकाने तपासाला सुरवात केली होती.
तपासादरम्यान लाचेची मागणी होत असल्याचे सिध्द झाल्यानंतर गुरुवारी दुपारी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात सापळा रचला होता. त्याठिकाणी लाच स्वीकारण्यासाठी सुट्टी असतानाही मुंबईकर पोलीस ठाण्यात उपस्थित होता. यावेळी लाच स्वीकारताना त्याच्यावर रंगेहाथ कारवाई करण्यात आली. त्याच्याविरोधात तक्रारदाराकडे लाच मागितल्याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Action on the demand for bribe, trap in Koparkhairane police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा