नवी मुंबई : तुर्भे विभागातील हॉटेलचालकांच्या अतिक्रमणांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. शनिवारी दोन हॉटेलचे अतिक्रमण हटविण्यात आले असून, कारवाई सुरूच ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामांवर नियमित कारवाई सुरू केली आहे; परंतु प्रशासनाकडून हॉटेलचालकांच्या अतिक्रमणांना अभय दिले जात होते. शहरातील बहुतांश सर्व प्रमुख हॉटेलचालकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. यामध्ये सर्वात जास्त प्रमाण तुर्भे विभागात आहे. येथील मोठ्या ३२ हॉटेल्समध्ये अतिक्रमण असून त्यांना प्रशासन अभय देत असल्याची टीका होऊ लागली होती. अखेर विभाग अधिकारी अंगाई साळुंखे यांनी शनिवारी कारवाई सुरू केली. सेक्टर १८मधील दिल्ली दरबार हॉटेल व्यवस्थापनाने पहिल्या मजल्यावर अनधिकृतरीत्या पत्रा शेड टाकून व्यवसाय सुरू केला होता. महाराष्ट्र नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५३ (१)अन्वये संबंधितांना नोटीस देण्यात आली होती; परंतु या नोटीसला प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर संबंधितांवर कारवाई करून ५० हजार रुपये दंड वसूल केला आहे.सेक्टर १९-डी मधील हॉटेल वन अॅण्ड कल्ट शॉप क्रमांक १११ सतरा प्लाझा येथे अनधिकृतरीत्या पोटमाळ्याचे वाढीव बांधकाम केलेले होते. त्यांनाही नोटीस दिली होती; पण संबंधितांनी स्वत:हून अतिक्रमण न काढल्यामुळे पालिकेने कारवाई करून ५० हजार रुपये दंड वसूल केला आहे. यापुढेही मोहीम सुरूच राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
तुर्भेमधील हॉटेल्सच्या अतिक्रमणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 2:44 AM