नवी मुंबई : सिडकोने पुन्हा एकदा बेकायदा बांधकामांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या व मागील चार महिन्यांत पूर्ण झालेली बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली जाणार आहेत. त्यासाठी कारवाईचे नोडनिहाय नियोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात ऐरोली नोडपासून करण्यात आली आहे. पुढील आठ दिवसांत या विभागातील ३१ बांधकामांवर बुलडोझर फिरविला जाणार आहे.न्यायालयाच्या निर्देशानुसार २0१२ नंतरच्या बेकायदा बांधकामांवर सिडकोने मे-जूनमध्ये कारवाईचा धडाका सुरू केला होता. परंतु या कारवाईला प्रकल्पग्रस्तांनी तीव्र विरोध केला होता. त्यामुळे सिडकोने महापालिका हद्दीतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत काहीसा सावध पवित्रा घेतला होता. याचा परिणाम म्हणून बेकायदा बांधकामांनी उचल खाल्ली आहे. सिडकोची कारवाई थंडावल्याने भूमाफियांनी बेकायदा बांधकामांचा धडाका लावला आहे. मागील तीन साडेतीन महिन्यात शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती उभारल्या आहेत. अनेक इमारतींची कामे तेजीत आहेत. महापालिका केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने सिडकोने बेकायदा बांधकामांच्या विरोधात पुन्हा एकदा कंबर कसली आहे. यापूर्वी सिडकोने २११ बांधकामांची यादी जाहीर केली होती. त्यातील तब्बल १३८ बांधकामे महापालिका कार्यक्षेत्रातील आहेत. उर्वरित उरण व पनवेल परिसरातील असून त्यातील बहुतांशी बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सिडकोने आता महापालिका क्षेत्रातील बांधकामांकडे आपला मोर्चा वळविला आहे.या अगोदर नोटिसा बजावलेल्या १३८ बांधकामांसह सध्या सुरू असलेल्या व मागील चार महिन्यांत पूर्ण झालेल्या बांधकामांवर प्राधान्याने कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई टप्प्याटप्प्याने व नोडनिहाय करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ऐरोली नोडची निवड करण्यात आली आहे. या विभागातील ३१ बांधकामांना नव्याने नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यावर गुरुवारपासून प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुढील आठ दिवसांत ऐरोली नोडमधील बेकायदा बांधकामांचा सफाया केल्यानंतर सिडको आपला मोर्चा पुढील नोड्सकडे वळविणार आहे.
नोडनिहाय अतिक्रमणांवर कारवाई
By admin | Published: November 28, 2015 1:31 AM