तुर्भेतील अतिक्रमणावर कारवाई
By admin | Published: February 7, 2017 04:22 AM2017-02-07T04:22:49+5:302017-02-07T04:22:49+5:30
तुर्भे नाक्यावर फेरीवाल्यांसह रिक्षा चालकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबई : तुर्भे नाक्यावर फेरीवाल्यांसह रिक्षा चालकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे. याविषयी ‘लोकमत’ने आवाज उठविताच पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली असून पोलिसांनी बेशिस्त रिक्षा चालक व डंपरचालकांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
नवी मुंबईमधील सर्वाधिक वाहतूक कोंडी तुर्भे नाक्यावर होत आहे. एमआयडीसीकडे जाणाऱ्या रोडवर एक बाजूला दोन लेनवर भाजी, फळ व इतर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते. याशिवाय पदपथावरही दुकानदारांनी आणि फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. रोडच्या दोन्ही बाजूला रिक्षा चालकांनी अनधिकृत स्टँड तयार केले आहे. रोडच्या मध्यभागी व बसस्टॉपवरही रिक्षाचालकांनी अतिक्रमण केले आहे. एकच लेन वाहतुकीसाठी उपलब्ध असून बस रोडच्या मध्येच उभी करावी लागत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होवू लागली होती. येथील मटण व इतर दुकानदारांनीही अतिक्रमण केले आहे. या सर्व अतिक्रमणांमुळे गत आठवड्यात दोन तरूणांचा मृत्यू झाला होता. रविवारी पुन्हा या परिसरात अपघात होवून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. डंपर व्यावसायिकांनी रस्त्यावर वाहने उभी केल्यानेही वाहतूक कोंडीमध्ये भर पडत होती.
‘लोकमत’ने तुर्भे नाक्यावरील वाहतूक कोंडीच्या समस्येवर प्रकाश टाकल्यानंतर तुर्भेच्या विभाग अधिकारी अंगाई साळुंखे यांनी येथील फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. रोज सकाळी येथील विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. वाहतूक पोलिसांनी बेशिस्त रिक्षा चालकांवर व डंपर चालकांवर कारवाई सुरू केली आहे. वाहतूक पोलीस व पालिकेच्या धडक मोहिमेमुळे २५ वर्षांमध्ये प्रथमच नाक्यावर रस्ते अतिक्रमणमुक्त झाले आहेत. वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. पुन्हा येथे फेरीवाल्यांनी अतिक्रमण करू नये यासाठी नियमित कारवाई सुरू ठेवावी, अशी मागणी केली जात आहे.