घणसोलीत फेरीवाल्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 03:16 AM2018-10-03T03:16:36+5:302018-10-03T03:16:52+5:30
पथकासोबत वाद : गुन्हे दाखल होऊनही फेरीवाले हटता हटेना
नवी मुंबई : घणसोली रेल्वेस्थानकासमोरील मार्गात अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांवर सोमवारी रात्री कारवाई करण्यात आली. या वेळी काही फेरीवाल्यांनी अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांसोबत वाद घालून कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी देखील तिथल्या काही अनधिकृत फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल झालेले असतानाही ते हटत नसल्याने त्यांच्यावर ठोस कारवाईची मागणी होत आहे.
घणसोली रेल्वेस्थानकासमोरील मार्गावर दीडशे मीटरची हद्द आखल्यानंतरही फेरीवाल्यांनी त्याठिकाणी अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात पादचारी नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत आहेत. अनेकांनी दुकानाबाहेरची जागा फेरीवाल्यांना भाड्याने दिली आहे. काही हॉटेल व्यावसायिकांनी अनेक महिन्यांपासून मार्जिनल स्पेसच्या जागेत पक्के बांधकाम देखील केलेले आहे, तर पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे पादचाºयांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन किरकोळ अपघाताच्या देखील घटना घडत आहेत. परंतु पालिकेच्या कारवायांमध्ये सातत्य नसल्याने फेरीवाल्यांना रस्ते आंदण मिळत होते. अखेर घणसोली विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख रोहित ठाकरे यांनी सोमवारी रात्री सदर परिसरात कारवाईची मोहीम राबवली. त्यांच्याकडून कारवाई सुरू असताना काही फेरीवाल्यांनी पथकाच्या कर्मचाºयांसोबत वाद घालून कारवाई थांबवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, विरोधाला न जुमानता त्यांच्यावर साहित्य जप्तीची, तसेच दंडात्मक कारवाई करण्यात आली. काही फेरीवाल्यांना राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्यावर कारवाईवेळी दबाव येत आहे. परंतु त्यापैकी काही अनधिकृत फेरीवाल्यांवर यापूर्वी देखील गुन्हे दाखल झालेले आहेत.