यादवनगरमधील झोपड्यांवर दुसऱ्या दिवशीही कारवाई
By admin | Published: February 10, 2017 04:34 AM2017-02-10T04:34:30+5:302017-02-10T04:34:30+5:30
पालिका व एमआयडीसी यांची यादवनगर परिसरातील अतिक्रमण विरोधी संयुक्त कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरू होती. या वेळी ४५० झोपड्या जमीनदोस्त करून
नवी मुंबई : पालिका व एमआयडीसी यांची यादवनगर परिसरातील अतिक्रमण विरोधी संयुक्त कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरू होती. या वेळी ४५० झोपड्या जमीनदोस्त करून तीन अनधिकृत तबेले पाडण्यात आले आहेत. या कारवाईअंतर्गत दोन दिवसांत सुमारे एक हजार अनधिकृत झोपड्या पाडण्यात आल्या आहेत.
शहरभर फैलावत चाललेल्या अनधिकृत झोपड्यांचे जाळे वेळीच थांबवण्याच्या उद्देशाने पालिकेने अतिक्रमणविरोधी मोहीम तीव्र केली आहे. त्यानुसार बुधवारी यादवनगर व देवीधाम पाडा येथून या कारवाईला सुरुवात करण्यात आली. कारवाईच्या पहिल्या दिवशी त्या ठिकाणच्या सुमारे सहाशे झोपड्या पाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाईचा धडाका सुरूच होता. त्यानुसार गुरुवारी सुमारे ४५० झोपड्या व तीन तबेले जमीनदोस्त करण्यात आले. त्याशिवाय चिंचपाडा येथील बेकायदेशीर गोडाऊनही पाडण्यात आले. तर तबेल्यांमधील गाई व म्हशी ताब्यात घेऊन त्या वाशीतील कोंडवाड्यात ठेवण्यात आल्या आहेत. सदर भूखंड हे एमआयडीसीचे असून विविध वापरांसाठी ते राखीव आहेत; परंतु तत्कालीन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे भूखंड भूमाफियांनी बळकावून त्यावर झोपड्या उभारून त्यांची विक्री केलेली आहे. त्यानंतरही इतर मोकळे भूखंड बळकावण्याचे प्रकार सुरूच होते. यामुळे एमआयडीसी व पालिका या दोन्ही प्राधिकरणाने संयुक्तरीत्या त्यावर कारवाईला सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)