बेकायदा इमारतीवर कारवाई
By admin | Published: December 24, 2016 03:25 AM2016-12-24T03:25:54+5:302016-12-24T03:25:54+5:30
सिडकोने शहरातील बेकायदा बांधकामांच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गोठीवली, रबाळेपाठोपाठ शुक्रवारी ऐरोलीतील
नवी मुंबई : सिडकोने शहरातील बेकायदा बांधकामांच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गोठीवली, रबाळेपाठोपाठ शुक्रवारी ऐरोलीतील एका बेकायदा इमारतीवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. पाच मजल्याच्या या इमारतीचे वरचे तीन मजले जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला. परंतु कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पूर्ण केली.
उच्च न्यायायलयाच्या निर्देशानुसार सिडकोने अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कंबर कसली आहे. गुरुवारी गोठीवली व रबाळे येथील अनधिकृत इमारतीवर बुलडोझर फिरविण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी ऐरोलीतील गावदेवी मंदिराजवळ उभारलेल्या एका पाच मजली इमारतीवर कारवाई करण्यात आली. या इमारतीचे वरचे तीन मजले पाडून टाकण्यात आले. महापालिकेच्या संयुक्त सहकार्याने ही कारवाई केली. सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक एस.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक नियंत्रक गणेश झिने यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईला स्थानिकांचा विरोध लक्षात घेवून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, ही मोहीम अधिक तीव्र करणार असल्याची माहिती झिने यांनी दिली. (प्रतिनिधी)