बेकायदा झोपड्यांवर कारवाई; घणसोलीत महापालिका, सिडकोची संयुक्त मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:42 AM2018-12-14T00:42:48+5:302018-12-14T00:43:21+5:30
घणसोली डी-मार्ट समोरील अनधिकृत बांधकामावर सिडको व महापालिकेने गुरुवारी संयुक्त कारवाई केली
नवी मुंबई : घणसोली डी-मार्ट समोरील अनधिकृत बांधकामावर सिडको व महापालिकेने गुरुवारी संयुक्त कारवाई केली. विशेष म्हणजे, या बांधकामधारकाला वारंवार नोटीस बजावण्यात आल्या होत्या; परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कडेकोट पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.
घणसोली सेक्टर ८ ए येथील डी-मार्ट समोर सिडकोच्या मोकळ्या मैदानावर बेकायदेशीर झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून यात वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार सिडकोच्या संबंधित विभागाकडून संबंधितांना नोटीसही बजावण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी पोलिसांचा मोठा ताफा तैनात ठेवण्यात आला होता. या वेळी सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे नियंत्रक पी. बी. राजपूत, सहायक नियंत्रक सुनील तांबे, भूमापक अधिकारी विकास खडसे, तसेच रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे, महापालिकेच्या वतीने घणसोली विभागाचे सहायक आयुक्त दत्तात्रेय नागरे, अतिक्र मण विभागाचे प्रमुख रोहित ठाकरे आदीचा समावेश होता. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोच्या मोकळ्या भूखंडावरील अतिक्र मणे हटविण्याची कारवाई नवी मुंबईत सुरू आहे, त्यानुसार घणसोली येथे शांताराम दगडू मढवी यांनी केलेल्या या अतिक्र मणावर कारवाई करण्यात आल्याचे पी. बी. राजपूत यांनी सांगितले.