नवी मुंबई : चरस व गांजाची विक्री करणाऱ्या चौघांवर कोपरखैरणे पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री कारवाई केली. कोपरखैरणे गावालगत खाडीच्या दलदलीच्या भागात अनेक वर्षांपासून हा अड्डा सुरू होता. पोलिसांनी त्यांच्याकडून ९७ हजार ५०० रुपयांचा चरस, गांजा व एमडी पावडर जप्त केली आहे.कोपरखैरणे सेक्टर १९ येथील खाडीकिनारी अंमली पदार्थांची विक्री केली जात होती. त्याची माहिती सहाय्यक आयुक्त अरुण वालतुरे यांना मिळाली. त्यांच्या निर्देशानुसार कोपरखैरणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक, निरीक्षक सतीश गायकवाड, सहाय्यक निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री त्या अड्ड्यावर छापा टाकला. चौघांना अटक केली असून त्यामध्ये हा अड्डा चालवणाऱ्या महिलेचाही समावेश आहे. पूनम वाझ (४२) असे तिचे नाव असून अनेक वर्षांपासून तिच्यामार्फत हा अड्डा सुरू होता. तिच्यावर यापूर्वी देखील कारवाई झालेली होती. तरीही खाडीलगतच्या भागात तिने हा अड्डा सुरू केला. अखेर त्याचीही माहिती मिळताच पोलिसांनी त्यावर कारवाई केली. यावेळी तिथे जयेश सोळंकी, मॅग्रॅक सिन्हा, निहार दास हे तिचे तीन साथीदार देखील आढळून आले. (प्रतिनिधी)
कोपरखैरणेत चरस, गांजा अड्ड्यावर कारवाई
By admin | Published: July 13, 2015 2:56 AM