पनवेल - घाटकोपर येथील दुर्दैवी होर्डिंग अपघातात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असल्याने या घटनेचा धडा घेत प्रशासन जागे झाले आहे. पनवेल मध्ये पालिकेने अनधिकृत होर्डिंग बाबत सर्वेक्षण सुरु केले आहे. मात्र सिडकोने त्यापुढे जाऊन दि.17 रोजी खारघर शहरातील अनधिकृत होर्डिंग्स हटविण्यास सुरुवात केली.
खारघर शहरात सायन पनवेल महामार्गावाजवळ हायवे ब्रेक हॉटेल जवळ अनधिकृत होर्डिंग पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह हटविण्यास सुरुवात केली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पालिकेने अवघ्या 87 होर्डिंग्सना परवाणगी दिली आहे.त्या व्यतिरिक्त शेकडो होर्डिंग्स अनधिकृतपणे उभ्या आहेत.पालिका प्रशासन तसेच सिडको प्रशासन या होर्डिंग्सवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आल्याचे दिसून येत आहे.घाटकोपर येथील घटनेमुळे शहरातील अनधिकृत होर्डिंग्सचा विषय ऐरणीवर आला आहे.