वाहनांच्या बनावट नंबर प्लेटप्रकरणी कारवाईचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 02:19 AM2020-02-16T02:19:47+5:302020-02-16T02:19:55+5:30
पनवेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एम.एच. ४६ बीएफ-९३७७ या ट्रेलरची
कळंबोली : बनावट नंबर प्लेटचा वापर करणाऱ्या वाहनांची झाडाझडती घेऊन कारवाई करण्याचे आदेश सहायक पोलीस आयुक्तांनी आयुक्तालयातील सर्व वाहतूक शाखांना दिले आहेत. बनावट नंबर प्लेट वापरणाºया वाहनांच्या विरोधात ‘लोकमत’मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत पोलिसांनी हे निर्देश दिले आहेत.
पनवेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एम.एच. ४६ बीएफ-९३७७ या ट्रेलरची पासिंग करण्यात आली आहे. या वेळी या ट्रेलरचालकाला १ फेब्रुवारी रोजी दंडाचे चलन वाशी वाहतूक पोलिसांनी पाठवले आहे. त्यांचा दंड २८०० रुपये इतका आहे. त्या अगोदर परेल येथूनही ८०० रुपये दंडाचे चलन मुंबई वाहतूक पोलिसांनी पाठवले आहे. तत्पूर्वी २०० रुपये दंडाचा संदेश चेंबूर येथून आला आहे. त्याशिवाय सानपाडा, खारघर वाहतूक शाखेचे चलनसुद्धा त्यांना संदेशाद्वारे पाठवले आहे. वास्तविक पाहता, हा ट्रेलर या परिसरात गेलाच नाही. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विशेष म्हणजे, या क्रमांकाची नंबर प्लेट लावून एक टेम्पोचालक व्यवसाय करीत असल्याचे ट्रेलरचा मालक गोरखनाथ आहेर यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी यासंदर्भात नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांना लेखी तक्रार केली होती. यासंदर्भात वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अरुण पाटील यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.