उद्यान घोटाळ्यातील सहभागींवर कारवाई, तपासणी न करताच बिलांना मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 12:43 AM2020-11-06T00:43:37+5:302020-11-06T00:43:54+5:30
Navi Mumbai : नवी मुंबई परिसरातील उद्यानांची देखभाल करण्यासाठी परिमंडळनिहाय ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. ठेकेदाराने काम केले नसतानाही जवळपास ८ कोटी रुपये त्यांना देण्यात आले होते.
नवी मुंबई : महानगरपालिकेतील उद्यान विभागामधील घोटाळ्या प्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. ठेकेदाराने न केलेल्या कामाचेही त्याला बिल देण्यात आले असून अस्तित्वात नसलेल्या भूखंडाच्या देखभालीसाठीही बिल देण्यात आले. या घोटाळ्याची सखोल चौकशी होणार असून सहभागी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
नवी मुंबई परिसरातील उद्यानांची देखभाल करण्यासाठी परिमंडळनिहाय ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. ठेकेदाराने काम केले नसतानाही जवळपास ८ कोटी रुपये त्यांना देण्यात आले होते. या प्रकरणी आमदार मंदा म्हात्रे यांनी आवाज उठविल्यानंतर मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी ठेकेदाराने केलेल्या कामाची चौकशी सुरू केली होती. दोन पथके तयार करून सर्व उद्यानांना भेटी देऊन केलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. पाहणीत ठेकेदाराने न केलेल्या कामांसाठीही त्यांना बिले देण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी सीएसआर तत्त्वावर हिरवळीची देखभाल केली जाते. तेथील देखभालीसाठीही २ हजार चौरस मीटर भूखंड अस्तित्वात नसताना बिले देण्यात आली आहेत. जवळपास १ लाख चौरस मीटर क्षेत्रफळ भूखंडासाठी अतिरिक्त शुल्क देण्यात आल्याचे आयुक्तांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत निदर्शनास आले आहे. तसेच, उद्यान विभागामध्ये घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे आयुक्तांनी उद्यान विभागाचे उपआयुक्त, ८ उद्यान सहायक, २ अधीक्षक, सहायक उद्यान अधिकारी या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तीन दिवसांत संबंधितांनी उत्तर देणे अपेक्षित आहे. समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई केली जाणार आहे. मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराने सादर केलेल्या माहितीपत्रकाची छाननी करणे आवश्यक होते. परंतु कोणत्याही प्रकारची छाननी न करता ती कागदपत्रे बिले देण्यासाठी सादर करण्यात आली असल्याचे निदर्शनास आले आहे.
निष्काळजीपणा भोवणार
उद्यान विभागातील घोटाळा प्रकरणी अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. शुक्रवारपर्यंत सर्वांनी नोटीसला उत्तर देणे अपेक्षित आहे. उत्तर न दिल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.