पाणथळ जागेवर डेब्रिज टाकल्याने कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 12:35 AM2021-03-12T00:35:58+5:302021-03-12T00:36:08+5:30

बेलापूर सेक्टर २७चा लोटस तलाव : आयुक्तांनी काम स्थगित करून संबंधितांना बजावली नोटीस

Action by placing debris on wetland site | पाणथळ जागेवर डेब्रिज टाकल्याने कारवाई

पाणथळ जागेवर डेब्रिज टाकल्याने कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : बेलापूर विभागातील सेक्टर २७ येथील लोटस तलाव परिसरात डेब्रिज टाकून भराव केला जात आहे. त्यामुळे तलावाची सुरक्षा धोक्यात आल्याची बाब काही पर्यावरणप्रेमींनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे आयुक्तांनी तत्काळ गुरुवारी ११ मार्च रोजी या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करून भरारी पथकाच्या टीमला नोटीस बजावली आहे. 
नवी मुंबई शहर हे समुद्रसपाटीपासून खाली आहे. समुद्राला येणाऱ्या भरतीच्या काळात शहरात पाणी शिरू नये म्हणून सिडकोकडून होल्डिंग पॉण्डची निर्मिती करण्यात आली होती. समुद्रातील उंच लाटांचा विचार करता शहरात ज्या ठिकाणी पाणी शिरू शकते त्या ठिकाणी सिडकोने हे होल्डिंग पॉण्ड उभारले आहेत.  परंतु या होल्डिंग पॉण्डची सफाई न झाल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून, खारफुटी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे स्वच्छता करताना  अनेक अडचणी येत आहेत. 

बेलापूर विभागातील सीवूड सेक्टर २७ परिसरात एक नैसर्गिक तलाव आहे. या तलावात मोठ्या प्रमाणावर कमळ फुलले असून यामुळे सौंदर्यात भर पडली आहे. या परिसरात असलेल्या सिडकोच्या भूखंडावर डेब्रिजचा भराव टाकण्यासाठी सिडकोने महापालिकेकडून परवानगी घेतली असून भराव टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु पाणथळ जागेवर डेब्रिजचा भराव टाकण्यात आला असल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
 डेब्रिज टाकण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेतली जाते, त्यामुळे महापालिकेकडे डेब्रिज टाकणाऱ्या प्रत्येक वाहनाची नोंद असते. त्यानंतर ते डेब्रिज नक्की कोठे टाकतात याकडे महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी धर्मेश बरई यांनी केला आहे. 
शहरातील पाणथळ जागांवर डेब्रिज टाकण्याचे काम सुरू असून महापालिका प्रशासनाने ‘माझी वसुंधरा’ वाचविण्याची विनंती पर्यावरणप्रेमी धर्मेश बरई यांनी केली आयुक्तांकडे केली होती. 

सिडकोने त्यांच्या मालकीच्या भूखंडावर भराव टाकण्यासाठी परवानगी मागितली होती, त्याअनुषंगाने परवानगी देण्यात आली होती. परवानगीनुसार भराव टाकताना पाणथळ जागा सोडून जमिनीवर भराव टाकणे अपेक्षित आहे. पण, पाणथळ जागेवरदेखील भराव टाकण्यात आला असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे डेब्रिज टाकण्याच्या कामाला स्थगिती दिली असून याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी भरारी पथकाच्या टीमला नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आलेला आहे.
- अभिजीत बांगर, 
आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका

लोटस तलाव परिसरातील जागा वेटलँड म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. सिडकोने परवानगी मागितली. महापालिकेने तपासणी न करता परवानगी दिली आणि त्याकडे दुर्लक्ष केल्याने पाणथळ जागेवर भराव टाकला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
- सुनील अगरवाल, 
पर्यावरणप्रेमी
 

Web Title: Action by placing debris on wetland site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.