ठाण्यातील ३५ तलावांच्या संवर्धनासाठी अॅक्शन प्लॅन
By admin | Published: November 28, 2015 01:15 AM2015-11-28T01:15:28+5:302015-11-28T01:15:28+5:30
कचराळी तलावाच्या झालेल्या दुरवस्थेबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल घेऊन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी सकाळी त्याची पाहणी केली.
ठाणे : कचराळी तलावाच्या झालेल्या दुरवस्थेबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल घेऊन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी सकाळी त्याची पाहणी केली. या वेळी तलावाच्या दुरवस्थेबाबत दुजोरा देऊन पुढील १५ दिवसांत त्याचा कायापालट झालेला असेल, अशी हमीही त्यांनी दिली. तसेच याकडे आपण जातीने लक्ष देणार असून रोज सायंकाळी त्याची पाहणी करणार असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे, शहरात शिल्लक असलेल्या ३५ तलावांची निगा, देखभालीचा कृती आराखडा
तयार करून एक अॅक्शन प्लॅन तयार केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
येथील उद्यानातील तुटलेली खेळणी, उखडलेले पेव्हरब्लॉक, कचरा, तलावातील दुर्गंधी, बंदावस्थेत असलेली पाणपोई, शौचालय आदींची त्यांनी पालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. त्यानंतर, या तलावाची निगा, देखभाल न करणाऱ्या
ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही दिला. तसेच सध्या नवीन शौचालये तयार होण्यापूर्वी येथे तात्पुरत्या स्वरूपात बायोटॉयलेटची व्यवस्था करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित विभागाला दिले.
या तलावाच्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यासाठी १ कोटी ९७ लाखांच्या प्रस्तावाला एक वर्षापूर्वीच मान्यता मिळाली होती. मात्र, त्या कामाला मुहूर्त सापडला नव्हता.
पालिकेच्या म्हणण्यानुसार यात काही तांत्रिक अडचणी होत्या. परंतु, आता त्या दूर झाल्या असून येत्या सोमवारी या कामाच्या शुभारंभाचा नारळ फुटणार आहे.
त्यानुसार, येथे सिंथेटीक पद्धतीचे जॉगिंग ट्रॅक, येणाऱ्या पर्यटकांसाठी बसण्यासाठी तंबू, गजिबो फाउंटन, पाणपोईची दुरुस्ती, रंगरंगोटी, तुटलेले कठडे दुुरुस्त करणे, शौचालय, अत्याधुनिक जीम आदींची कामे केली जाणार आहेत.