चिरनेर : उरण महावितरणने वीजचोरांवर कडक कारवाईचे संकेत दिले असून गेल्या महिनाभरात जवळपास चाळीस वीजचोरांवर कारवाई केली असल्याची माहिती उरण महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रवीण साळी यानी दिली. वीजगळती आणि वीजचोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुक्यात सर्वत्र मीटर तपासणीची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली जाते. ही वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणने विशेष कारवाई मोहीम हाती घेतली आहे. महावितरणने कारवाई केलेल्या ४० वीजचोरांकडून तब्बल १० लाख ७६ हजार ३३० रूपये इतका दंड वसूल केला आहे. या ग्राहकांनी सुमारे ६९ हजार ९४३ इतक्या युनिटची चोरी केल्याचे उघड झाले आहे. ही वीजचोरी करताना ग्राहकांनी अनेक क्लृप्त्या लढविल्याचे पुढे आले आहे. काही ग्राहकांनी वीज मीटरच्या सर्किटमध्ये फेरफार केला होता, काहींनी सर्व्हिस वायरला टॅपिंग केले होते तर काहींनी मीटरमध्ये लुपिंग करून वीज वापरत होते. या प्रकारामुळे विजेचा वापर जास्त होत असला तरी मीटरची रिडिंग कमी पडत असल्याने वीजगळती जास्त येत होती. सध्या उरण तालुक्यात वीजचोरीचे आणि वीज गळतीचे प्रमाण जवळजवळ ४0 टक्केच्या आसपास आहे. जेएनपीटी फिडर आणि जीटीपी फिडरवर हे प्रमाण जवळ जवळ ४२ टक्के आहे. वीज गळतीचे प्रमाण ४२ टक्केच्या पुढे गेल्यास त्या फिडरवर लोड शेडिंग केले जाते. सध्या हे फिडर लोड शेडिंगच्या नियमात बसत असून येथील वीज गळती कमी झाली नाही तर येथे लवकरच लोड शेडिंग केले जाईल असे प्रवीण साळी यांनी सांगितले.
उरणमध्ये वीजचोरांवर कारवाई
By admin | Published: November 10, 2015 12:53 AM