शहरात आरटीओची ६०४ वाहनांवर कारवाई
By admin | Published: June 19, 2017 05:10 AM2017-06-19T05:10:04+5:302017-06-19T05:10:04+5:30
आरटीओने मागील सहा महिन्यांत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुमारे ६०४ वाहनांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये खासगी वाहनांचा समावेश असून
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : आरटीओने मागील सहा महिन्यांत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुमारे ६०४ वाहनांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये खासगी वाहनांचा समावेश असून, ठाणे-बेलापूर मार्गास उरण मार्गावर धावणारी खासगी वाहने सर्वाधिक आहेत. मात्र, अद्यापही अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याच्या कारणावरून एनएमएमटी प्रशासनाने वाहतूक पोलीस, आरटीओच्या कामगिरीबाबत असमाधान व्यक्त केले .
खासगी वाहनांमधून होणारी अवैध प्रवासी वाहतूक आरटीओसह वाहतूक पोलिसांची डोकेदुखी ठरू लागली आहे. मिनी बस, जीप यामधून विविध मार्गांवर ही अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. याचा परिणाम एनएमएमटीच्या प्रवासी संख्येवर होत आहे. ज्या मार्गावर एनएमएमटीच्या बस धावतात, त्याच मार्गावर बसच्या काही वेळअगोदर ही खासगी वाहने चालवली जातात. यामुळे बसच्या प्रतीक्षेत थांबलेले प्रवासी नाइलाजास्तव खासगी वाहनांतून प्रवास करतात.
या वाहनचालकांकडून स्वत:च्या नफ्यासाठी काही मार्गावरील एनएमएमटीच्या बस बंद करण्याचाही प्रयत्न यापूर्वी झाला आहे. यामुळे आरटीओतर्फे मागील सहा महिन्यांत ६०४हून अधिक वाहनांवर कारवाई केली असल्याचे आरटीओ अधिकारी संजय डोळे यांनी सांगितले. त्यामध्ये एनएमएमटी प्रशासनाद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार केलेल्या कारवायांचाही समावेश आहे.
नुकतेच ठाणे येथे आरटीओ अधिकारी व परिवहन अधिकारी यांच्यात बैठक घेण्यात आली होती. या वेळीही अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा चर्चेला आला होता; परंतु अद्यापही शहरात खासगी वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याची खंत एनएमएमटीचे व्यवस्थापक शरद आरदवाड यांनी व्यक्त केली आहे. तर यासंबंधी अनेकदा आरटीओ व वाहतूक पोलिसांना पत्राद्वारे तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले.
अनेकदा खासगी ट्रॅव्हलर्सकडूनही अवैध वाहतूक केली जाते. सिग्नल्स, ठिकठिकाणी अवैध थांबे करून वाहतूककोंडी करण्यात येत असल्याचे दिसत आहे.